Join us

म्हाडाचे घर खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; एका क्लिकमुळे होईल लाखोंचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 7:01 PM

म्हाडाच्या वेबसाईटसारखी बनावट वेबसाईट तयार करुन लोकांची फसवणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

MHADA Fake Website :म्हाडामुंबई मंडळाकडून नुकतीच लॉटरीची जाहिरात काढण्यात आलीय. म्हाडाच्यामुंबई मंडळाच्या २०३० घरांच्या सोडतीचा कार्यक्रम म्हाडाने जाहीर केला. ९ ऑगस्टपासून म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज भरायला सुरुवात झाली आहे. मात्र आता म्हाडा लॉटरीच्या नावाखाली लोकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. म्हाडाची बनावट वेबसाईट तयार करुन फसवणूक होत असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी आता या प्रकरणी मुंबई सायबर सेलकडे तक्रार दाखल केली असून याबाबत तपास सुरु करण्यात आलाय.

म्हाडाच्या बनावट वेबसाईटवरुन लोकांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. MHADA.Org MHADA अशी म्हाडाच्या वेबसाईटची हुबेहुब वेबसाईट तयार करुन ही फसवणूक करण्यात आलीय. या वेबसाईटवरुन आतापर्यंत चार नागरिकांची फसवणूक झाल्याचे समोर आलं आहे. या बनावट वेबसाईटवरुन घर पाहिजे तर सहा लाख भरा एकूण किंमत २९ लाख रुपये अशी जाहिरात देण्यात आली आहे. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर म्हाडाच्या आयटी विभागाकडून यासंदर्भात सायबर सेलकडे तक्रार करण्यात आली आहे. म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म भरणाऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचं असल्याचे समोर आलं आहे.

झी २४ तासने दिलेल्या वृत्तानुसार, गोरेगावमधील चार नागरिक या वेबसाईटला बळी पडले आहेत. म्हाडाच्या वेबसाईटसारखी हुबेहुब वेबसाईट तयार करण्यात आली असून यावरुन लोकांची फसवणूक केली जात आहे. याची माहिती मिळताच म्हाडाच्या आयटी विभागाने मुंबई सायबर सेलकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. तसेच अशा बनावट वेबसाईटवर जाऊ नका आणि पैसे भरु नका अशी सूचना म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.  mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरच अर्ज नोंदणी, अर्ज भरणा आणि अनामत जमा प्रक्रिया सुरु असल्याचे म्हाडाने सांगितले.

बनावट वेबसाईटवरुन नागरिकांकडून सहा लाखांची मागणी करण्यात येत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवर पैसे भरण्याचा कोणताही पर्याय नाहीये. मात्र बनावट वेबसाईटवर पैसे भरण्याचा पर्याय देण्यात आला आहे.

दरम्यान, म्हाडाकडून  २०३० घरांसाठी ही लॉटरी काढण्यात येणार आहे. या लॉटरीमध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी ३५९, अल्प उत्पन्न गटासाठी ६२७, मध्यम उत्पन्न गटासाठी ७६८ आणि उच्च उत्पन्न गटासाठी २७६ घरं उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. मुंबई उपनगरातील पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी, पवई, कन्नमवारनगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड या ठिकाणी म्हाडाची घरे आहेत. तर अत्यल्प (६ लाख), अल्प (९ लाख), मध्यम (१२ लाख), उच्च उत्पन्न गट म्हणजे १२ लाखांपेक्षा अधिक असे गट करण्यात आले आहेत. 

टॅग्स :मुंबईम्हाडासुंदर गृहनियोजनमुंबई पोलीस