ऑनलाइन शॉपिंग ॲपवरून महिलेची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:05 AM2021-06-23T04:05:07+5:302021-06-23T04:05:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अवघ्या काही हजारांच्या कपड्यांची ऑनलाइन शॉपिंग करणे महिलेला महागात पडले. कपडे परत करण्याच्या नादात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अवघ्या काही हजारांच्या कपड्यांची ऑनलाइन शॉपिंग करणे महिलेला महागात पडले. कपडे परत करण्याच्या नादात तिला दोन लाख रुपये गमवावे लागले. मात्र समतानगर येथील सायबर पोलिसांच्या तत्परतेमुळे त्यातील दीड लाख तिला परत मिळाले जे उडीसा येथील बनावट बँक खात्यात जमा करण्यात आले होते.
सदर महिलेने एका शॉपिंग साइटवर पाच हजारांचे कपडे खरेदी केले होते. मात्र ते कपडे तिला मोठे होऊ लागल्याने तिला ते परत करायचे होते. तेव्हा तिने सदर वेबसाइटचा ऑनलाइन क्रमांक डायल केला. मात्र कोरोनाकाळात ती कपडे परत करू शकत नाही, असे सांगण्यात आले. मात्र तिला पैसे परत हवे असल्यास एक अन्य ॲप डाउनलोड करून त्यात दिलेल्या स्टेप्स फॉलो केल्यास पैसे परत मिळतील, असे आमिष दाखविण्यात आले. त्यानुसार महिलेने ॲप डाउनलोड केले. महिलेचा फोन सुरू असताना तिच्या खात्यातून जवळपास दोन लाख रुपये काढण्यात आले. ही बाब फोन ठेवल्यानंतर मोबाइलमध्ये आलेल्या मेसेजेसमुळे तिला समजली आणि तिने याप्रकरणी समतानगर पोलीस ठाण्यातील सायबर सेलमध्ये धाव घेतली. या सेलच्या प्रमुख सरला वसावे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पथकाने चौकशी करत जवळपास दीड लाख रुपये महिलेला परत मिळवून दिले. याप्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.