Join us  

'उद्धवजींचा नको, अनिल परबांचा फोन तपासा सगळं उघड होईल', दीपक केसरकरांचा मोठा गौप्यस्फोट!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 12:59 PM

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर संघटनेला सावरण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी आदित्य ठाकरे यांचं सध्या शिवसंवाद अभियान सुरू आहे.

मुंबई

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर संघटनेला सावरण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी आदित्य ठाकरे यांचं सध्या शिवसंवाद अभियान सुरू आहे. या अभियानात आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांवर जोरदार टीका करत आहेत. आदित्य ठाकरेंच्या याच टीकेला प्रत्युत्तर देताना शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी तुम्ही अजून लहान आहात आणि प्रादेशिक अस्मिता काय असते हे तुम्हाला ठावूक नाही. त्यामुळे आम्ही हाडाचे शिवसैनिक असून टीका करताना जरा विचार करुन बोला, असं म्हटलं. दीपक केसरकर मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत दादा भुसे, संदीपान भुमरे आणि संजय राठोड उपस्थित होते. 

आदित्य ठाकरेंच्या टीकेला उत्तर देण्यासोबतच दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना केलेल्या फोनच्या प्रकरणातही एक गौप्यस्फोट केला. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना फोन करुन तुम्ही शिंदेंना बाजूला ठेवा आम्ही भाजपासोबत सत्ता स्थापन करण्यासाठी तयार आहोत अशी बातमी माध्यमांमध्ये प्रसारित करण्यात आली होती. यावर अधिक बोलताना दीपक केसरकर यांनीही या घटनेला दुजोरा दिला. 

नेमकं काय म्हणाले दीपक केसरकर?"मी मीडियामध्ये बातमी वाचली की उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना फोन केला होता. तिथं त्यांनी शिंदेंना बाजूला ठेवा मी स्वत: तुमच्याबरोबर येतो आणि आपण युती करुया असं म्हटलं गेलं होतं. म्हणजे तुमच्या पक्षामध्ये जे नंबर दोनचे नेते आहेत आणि जे तुमचा आदर करतात तुम्ही त्यांच्याच बाबत जर असं करत असाल तर आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकाचं काय होईल? आता याबातमीवर शिवसेनेकडून स्पष्टीकरण देण्यात आलं की हे खोटं आहे. जर हे खोटं असेल तर तुम्ही अनिल परबांचा फोन तपासून पाहा. त्यातून जर फडणवीसांना फोन गेला असेल तर निश्चितपणे हे घडलं असेल असं मला वाटतं. कारण कधी उद्धव ठाकरेंचे फोन हे त्यांच्या फोनवरुन जात नाहीत. अनिल परबांच्या फोनवरुन जातात. त्यामुळे त्यांचा फोन तपासा मग स्पष्टीकरण द्या", असं दीपक केसरकर म्हणाले. 

नेमकं प्रकरण काय?एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळी बंड केलं आणि ठाकरे सरकार कोसळण्याच्या मार्गावर होतं. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना फोन करुन शिंदे यांना बाजूला करा आम्ही युतीसाठी तयार आहोत असा प्रस्ताव ठेवला होता अशी बातमी समोर आली होती. या बातमीनं खळबळ उडाल्यानंतर शिवसेनेकडून या वृत्ताचं खंडन करण्यात आलं. पक्षाचे माध्यमप्रमुख हर्षल प्रधान यांनी अशापद्धतीचा कोणताही फोन उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना केलेला नसल्याचं स्पष्ट केलं होतं. 

 

टॅग्स :दीपक केसरकर उद्धव ठाकरेएकनाथ शिंदेआदित्य ठाकरे