लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्यासंदर्भातील मॉर्फ व्हिडीओचा मुद्दा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मंगळवारी विधानपरिषदेत उपस्थित केला. या प्रकरणात प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे यांचे फेसबुक अकाउंटही तपासण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.
अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलताना दानवे म्हणाले, एका आमदाराचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ मीच १० लोकांना पाठवला आहे. यूट्यूबवर लाखो लोकांनी हा तो पाहिला आहे. ३२ देशांतील लोकांपर्यंत हा तो पोहोचला आणि पोलिस विनाकारण दुसऱ्या लोकांवर कारवाई करत आहेत. हा व्हिडीओ ओरिजनल आहे की मॉर्फ आहे, याची चौकशी न करता पोलिस कारवाई करत आहेत, आपली रिव्हॉल्व्हर दुसऱ्याला देणे गुन्हा नाही का?
दानवे यांनी यावेळी सदा सरवणकर यांच्या रिव्हॉल्व्हरचा मुद्दाही उपस्थित केला. पोलिस म्हणतात की, ‘गोळी झाडली तेव्हा बंदूक आमदाराच्या हातात नसावी’. मग आपली रिव्हॉल्व्हर दुसऱ्याच्या हातात देणे हा गुन्हा ठरत नाही का? पण गृहमंत्रालय आणि सरकार गुन्हे करणाऱ्यांच्या बाजूने आहे की काय, अशी शंका येते, असेही ते म्हणाले.
गुन्हा दाखल करा!
आमदाराचा व्हिडीओ बनावट असेल तर जरूर कारवाई करा. पण, तो खरा असेल तर खासगी संबंध ज्याच्या त्याच्या घरी... सार्वजनिक ठिकाणी अशा गोष्टी होत असतील तर त्यांच्यावरही गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अशी मागणी दानवे यांनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"