लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात १ कोटी ५० लाखांपेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिक असून, त्यांची राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या सर्व रुग्णालयांत वर्षातून दोनदा मोफत तपासणी करावी. त्यांना काही आजार आढळून आल्यास महात्मा फुले योजनेंतर्गत त्यांच्यावर मोफत उपचार करावेत, असे आदेश सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना देण्यात आले आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या तपासणीसाठी आठवड्यातील दोन स्वतंत्र दिवस असतील.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही महिन्यांपूर्वी ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात बैठक घेतली होती. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना आरोग्याच्या सुविधा सहज पद्धतीने कशा देता येतील यावर आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानुसार त्यांच्यासाठी स्वतंत्र बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी) आणि स्वतंत्र दोन दिवस असावेत असे ठरविण्यात आले. तसेच वर्षातून दोनदा ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची मोफत चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार वैद्यकीय शिक्षण विभागाला आदेश देण्यात आले आहेत.
ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष कक्ष तयार करणार nवैद्यकीय शिक्षण विभागाची राज्यात २५ वैद्यकीय महाविद्यालये असून, चार दंत महाविद्यालये आहेत. nया सर्व महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांत आता यापुढे ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष कक्ष निर्माण करण्यात येणार आहेत. nत्या आरोग्य तपासणीची नोंद आभा कार्ड आणि एचएमआयएस प्रणालीमध्ये केली जाणार आहे. आजार आढळल्यास?nया वैद्यकीय चाचणीत काही आजार आढळून आल्यास त्यावर महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या अटी व शर्तींनुसार उपचार करण्यात येणार आहेत. nशासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये येथे या योजनेच्या माहितीचे फलक रुग्णालय परिसरातील प्रथम दर्शनी भागात लावण्यात येणार आहेत.
मोठ्या प्रमाणात जागृती करणार काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाच्या सर्व सूचना राज्यातील सर्व अधिष्ठात्यांना देण्यात येणार आहेत. तसेच या निर्णयाची मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे. ओपीडीमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी आठवड्यातील स्वतंत्र दोन दिवस ठेवण्यात येणार आहेत. - राजीव निवतकर, आयुक्त, वैद्यकीय शिक्षण विभाग