झक्कास! एसटी चालकांसाठी मुंबई सेंट्रलमध्ये खास विश्रांतीगृह 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 02:36 AM2023-05-31T02:36:04+5:302023-05-31T02:36:20+5:30

दीपक केसरकर यांच्या हस्ते हीरकणी कक्षाचे उद्घाटन

Check it out Special Rest House in Mumbai Central for ST Drivers deepak kesarkar opens | झक्कास! एसटी चालकांसाठी मुंबई सेंट्रलमध्ये खास विश्रांतीगृह 

झक्कास! एसटी चालकांसाठी मुंबई सेंट्रलमध्ये खास विश्रांतीगृह 

googlenewsNext

मुंबई : दिवसभर दमून-भागून आलेल्या कष्टकरी चालक-वाहकांना चांगली झोप लागावी, यासाठी खास वातानुकूलित विश्रांतिगृह बांधून देण्याचे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री आणि मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले. ‘लोकमत’मध्ये बकाल विश्रामगृहांबाबत ‘ना पाणी, ना लाइट, महिला कर्मचाऱ्यांचे नाक अक्षरशः मुठीत’ या मथळ्याखाली २४ डिसेंबर २०२२ रोजी वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. त्याची दखल घेण्यात आली आहे.  

मुंबई सेंट्रल बसस्थानकावर जिल्हा नियोजन मंडळाच्या ३ टक्के निधीतून बांधण्यात आलेल्या पहिल्या हिरकणी कक्षाचे उद्घाटन मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी याप्रसंगी मुंबई सेंट्रल येथील सध्याच्या चालक-वाहक विश्रांतिगृहाला भेट दिली व एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने मुंबई शहराचे जिल्हाधिकारी राजीव नीवतकर व एसटीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

हा प्रकल्प पथदर्शी ठरेल
मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने जिल्हा नियोजन विकास निधीतून मुंबई सेंट्रल बसस्थानक येथील महिला व पुरुष विश्रांतिगृह वातानुकूलित सुविधेसह अत्याधुनिक करून देण्याचे निर्देश कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांना दिले. भविष्यात प्रत्येक जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठी सर्व सोयीसुविधानी सुसज्ज अशी विश्रांतिगृहे जिल्हा नियोजन व विकासयोजनेतून व्हावीत, यासाठी हा प्रकल्प पथदर्शी ठरेल, असा आशावाद याप्रसंगी मंत्री केसरकर यांनी व्यक्त केला.

...म्हणून एसटीला आले ‘अच्छे दिन’
केसरकर पुढे म्हणाले की, मी कोकणातील आहे. एसटी आणि कोकणी माणसांचे ऋणानुबंध खूप जुने आहेत. गणपती व होळीसारख्या सणांबरोबरच मुंबईच्या चाकरमान्यांना उन्हाळी सुटीसाठी, आंगणेवाडीच्या यात्रेसाठी सुखरूप घेऊन जाण्याचं काम गेली कित्येक वर्षे एसटी इमानेइतबारे करीत आली आहे. यावेळी त्यांनी सावंतवाडी-मुंबई या पहिल्या रातराणी बसची आठवण आवर्जून सांगितली. अमृतमहोत्सवी ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या एसटी बसमधून मोफत प्रवास व महिलांना ५० टक्के प्रवासी भाड्यात सवलत या शासनाने घेतलेल्या दोन क्रांतिकारी निर्णयामुळे एसटीला पुन्हा ‘अच्छे दिन’ आले आहेत, हे पाहून शासनाचा एक घटक म्हणून मला अभिमान वाटतो, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

Web Title: Check it out Special Rest House in Mumbai Central for ST Drivers deepak kesarkar opens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.