लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचा फटका जवळपास ६० पदव्युत्तर विभागांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना बसत आहे. विद्यापीठाच्या विविध पदव्युत्तर विभागांमध्ये पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना २७ जूनपासून ऑनलाइन शुल्क भरायचे होते. मात्र, शुल्क भरण्यासाठी ऑनलाइन लिंकच वेळेत उपलब्ध न झाल्याने विद्यार्थी शुल्क भरू शकले नाहीत. अखेर २७ जूनला विद्यापीठाला परिपत्रक काढून लिंक भरण्याची मुदत २९ जूनपर्यंत वाढवावी लागली आहे. विद्यापीठाने मात्र लिंक उपलब्ध न झाल्याने प्रवेशास विलंब झाल्याची बाब नाकारली आहे. विद्यापीठाने २२ मेपासून पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू केली. यानुसार २६ जूनला प्रवेशाची पहिली यादी लावण्यात आली.
या विद्यार्थ्यांना २७ जून ते १ जुलैपर्यंत ऑनलाइन शुल्क जमा करायचे होते, तसेच संबंधित विभागांना वर्ग १ जुलैपासून सुरू करावयास सांगण्यात आले होते. मात्र, २७ जूनला शुल्क भरण्याकरिता ऑनलाइन लिंकच काम करत नव्हती, अशी तक्रार एका प्रवेशोच्छुक विद्यार्थ्याने केली. यामुळे प्रवेशाचे वेळापत्रक कोलमडून गेले आहे. नव्या वेळापत्रकानुसार २९ जून (सायंकाळी ५ वाजेनंतर) ते ३ जुलैदरम्यान ऑनलाइन शुल्क भरण्याकरिता मुदत देण्यात आली आहे. गंमत म्हणजे वर्ग आधीच्या तारखेनुसार, म्हणजे १ जुलैपासूनच सुरू करायचे आहेत.
हे जाणीवपूर्वक केले जातेय का?विद्यापीठाच्या संबंधित आयटी विभागाला कळविले न गेल्याने ऑनलाइन लिंक उपलब्ध करून देण्यास विलंब झाल्याची माहिती विद्यापीठातील सूत्रांनी दिली. विद्यार्थी शुल्क भरण्यास गेल्यानंतर हा गोंधळ लक्षात आला. या अशा भोंगळ कारभारामुळे विद्यापीठाच्या विभागात प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी नाइलाजाने अन्य कॉलेजांमध्ये किंवा विद्यापीठांकडे वळतात. हे जाणीवपूर्वक केले जाते का, हे तपासण्याची गरज आहे, असा संशय एका विभागातील प्राध्यापकांनी व्यक्त केला.
विद्यापीठाचे म्हणणे काय? - या गोंधळाबाबत विद्यापीठाचे उपकुलसचिव (जनसंपर्क) लीलाधर बनसोड यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी मुंबई व राज्याबाहेरील विद्यार्थ्यांसाठी शुल्क भरण्याचा कालावधी बदलल्याचा खुलासा केला. - शुल्क भरण्यासाठीची लिंक वेळेत उपलब्ध झाली नसल्याची बाबही त्यांनी नाकारली. शनिवारी ५ वाजेपासून लिंक सुरळीतपणे सुरू झाली आहे आणि विद्यार्थी ऑनलाइन शुल्क भरू शकतात, असे त्यांनी सांगितले.