मुंबई : अचानक फुटलेल्या जलवाहिन्यांच्या गळतीचे उगम शोधण्याचे यंत्रच पालिकेकडे नसल्यामुळे लाखो लीटर पाणी वाहून जात आहे़ या घटना रोखण्यासाठी अखेर पालिकेने जमिनीखालील जलवाहिन्यांच्या जाळ्यांची सद्य:स्थिती तपासण्याची तयारी केली आहे़मुंबईतील बहुतांशी जलवाहिन्या ब्रिटिशकालीन आहेत़ जीर्ण झालेल्या जलवाहिन्यांतून पाणीगळतीचे प्रमाण वाढले आहे़ मात्र या जलवाहिन्यांमधील गळतीचा शोध कॅमेऱ्यातून घेण्यात येतो़ त्याचा फारसा परिणाम दिसून येत नाही़ त्यामुळे सेन्सर लावण्याची मागणी होऊ लागली होती़ परंतु यावर अद्याप कोणताच निर्णय झालेला नाही़ मात्र गळती रोखण्यासाठी जलवाहिनीतून कुठून पाणी बाहेर पडत आहे, हे शोधणे महत्त्वाचे आहे़ भूमिगत जलवाहिन्यांची सद्य:स्थिती तपासण्यासाठी पालिकेने या कामासाठी इच्छुक संस्थांकडून निविदा मागविल्या होत्या़ त्यानुसार चार कंपन्यांनी जलवाहिन्यांचा अभ्यास करण्याची तयारी दाखविली आहे़ पुढच्या महिन्यात चारही कंपन्यांना काम देण्यात येईल़ यामधील सर्वोत्तम तंत्रज्ञान देणाऱ्या कंपनीची निवड करण्यात येईल, असे जल अभियंता खात्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले़ (प्रतिनिधी)
भूमिगत जलवाहिन्यांची सद्य:स्थिती तपासणार
By admin | Published: November 17, 2014 1:17 AM