मुंबई : एका विकासकाचे अपहरण करून त्याच्यावर रिव्हॉल्व्हर रोखून त्याच्याकडून बळजबरीने कोटींचा चेक साईन करून घेतल्याचा प्रकार गुरुवारी दिवसाढवळ्या अंधेरी परिसरात घडला. या प्रकरणी संबंधित विकासकाने अंबोली पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. हे चौघेही सध्या फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.सुधीर पोतेरी असे या विकासकाचे नाव असून, ते अंधेरीच्या वीरा देसाई परिसरात असलेल्या शास्त्री नगरमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहतात. पोतेरी यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, अपहरणकर्त्यांपैकी वीरेंद्र सिंग उर्फ बल्ली याने पोतेरी यांना गुरुवारी अंधेरीच्या वीर देसाई परिसरात येण्यास सांगितले. त्यानुसार ते दुपारी साडे चारच्या सुमारास संबंधित ठिकाणी पोहोचले. त्या वेळी बल्लीने पोतेरी यांना बळजबरीने स्वत:च्या गाडीमध्ये बसवून सुरुवातीला अंधेरी चार बंगला आणि नंतर वर्सोवा परिसरात एका इमारतीजवळ नेले. जिथे आधीपासून हजर असलेल्या चार जणांच्या साहाय्याने बल्ली याने पोतेरी यांना एका आॅफिसमध्ये नेत कुण्या गुरुभाईकडे नेले. त्यानंतर त्यांच्या अन्य साथीदारांनी पोतेरी यांना शिवीगाळ केली; तर एकाने त्यांच्यावर रिव्हॉल्व्हर रोखले. शिवाय त्यांच्याकडून बळजबरीने १ कोटी १० लाख रुपयांचा चेक लिहून घेतला. इतकेच नाही, तर चेक वटला नाही तर घरी येऊन गोळ्या झाडण्याची धमकी दिली, असे त्यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे.अंबोली पोलिसांनी या प्रकरणी बल्ली, गुरुभाई, राजू आणि त्यांच्या अन्य चार साथीदारांवर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश खडतरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा देत ‘आम्ही या प्रकरणी अधिक चौकशी करीत आहोत. सध्या या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आली नसून तपासाअंती योग्य ती कारवाई केली जाईल,’ असे सांगितले. (प्रतिनिधी)
रिव्हॉल्व्हरच्या धाकाने घेतला चेक
By admin | Published: October 19, 2015 1:36 AM