विमानतळाची क्षमता तपासा, मगच विमाने वाढवा, नागरी विमान सुरक्षा विभागाचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 06:04 AM2023-05-30T06:04:42+5:302023-05-30T06:04:57+5:30
विमानतळ व्यवस्थापन कंपन्यांचा नाराजीचा सूर
मुंबई : देशातील विमान प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता विमानतळ व्यवस्थापन कंपन्यांनी नवीन विमानांना उड्डाणासाठी अनुमती देण्यापूर्वी संबंधित विमानतळाची प्रवासी संख्या हाताळण्याची क्षमता किती आहे, याचा अभ्यास करावा आणि मगच नव्या विमानांना परवानगी द्यावी, असे निर्देश नागरी विमान सुरक्षा विभागाने (ब्यूरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन) जारी केले आहेत.
प्रवाशांची वाढती संख्या आणि त्यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय या अनुषंगाने हे निर्देश जारी केल्याचे नागरी विमान सुरक्षा विभागाचे म्हणणे असले तरी, यामुळे आमच्या खर्चात प्रचंड वाढ होईल, असे सांगत विमानतळ व्यवस्थापन कंपन्यांनी नाराजाची सूर लावला आहे. अर्थात, या निर्देशांची नजीकच्या भविष्यात अंमलबजावणी होण्याची शक्यता कमीच असल्याचे मत हवाई क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
उपलब्ध माहितीनुसार, कोरोनानंतर लोकांनी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर विमान प्रवास करण्यास सुरुवात केली आहे. प्रवाशांच्या सोयीच्या वेळा लक्षात घेता विमान कंपन्यांनी आपल्या विमान उड्डाणाचे नियोजन केले आहे. देशांतर्गत विमानसेवेत बहुतांश विमानतळ हे पहाटे ५ ते रात्री १०.३० पर्यंत व्यस्त असतात तर बहुतांश आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण हे रात्रीच होते.
विशिष्ट वेळेतच अनेक विमानांचे उड्डाण होत असल्यामुळे विमानतळावर प्रवाशांची मोठी गर्दी होते. याखेरीज दुसरा मुद्दा म्हणजे, विमानतळांवर असलेल्या पायाभूत सुविधादेखील वाढत्या प्रवासी संख्येच्या तुलनेत अपुऱ्या पडू लागल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने विमानतळांवर असलेली सुरक्षा तपासणी मशीन, बॅगांची तपासणी करणारी एक्स-रे मशीन, सुरक्षा तपासणीवेळी हातातील सामान ठेवण्यासाठी उपलब्ध असलेले ट्रे आदी अनेक लहान-मोठ्या गोष्टींचा समावेश आहे.
का वाढले विमान ट्रॅफिक?
देशात अनेक नवीन विमानतळे सुरू झाली आहेत.
नवनव्या मार्गावर विमान कंपन्यांनी विमानसेवा सुरू केली आहे.
गो-फर्स्टसारखी कंपनी बंद पडल्यामुळे त्या कंपनीच्या मार्गांवरदेखील अन्य विमान कंपन्यांनी सेवा सुरू केली.
आजच्या घडीला विमान प्रवासाचे नॉन-मेट्रो मार्गांवरचे दर हे रेल्वेच्या फर्स्ट क्लास एसीच्या दरांच्या आसपास आहेत. त्यामुळे वेळ वाचविण्यासाठी लोक विमान प्रवासाला प्राधान्य देतात.