खेळणी घेताना आयएसआय मार्क तपासा, भारतीय मानक ब्युरोचा छापा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 11:57 AM2022-01-24T11:57:56+5:302022-01-24T11:58:53+5:30
भारतीय मानक ब्युरोचा छापा, छाप्यादरम्यान नियमबाह्य खेळणी केली जप्त
मुंबई : भारतीय मानक ब्युरोच्या मुंबई शाखेतील अधिकाऱ्यांच्या पथकाने गोरेगाव भागातल्या ओबेरॉय मॉलमधल्या मेसर्स हैमलेज, मेसर्स रिलायन्स ब्रॅंडस् लिमिटेड या दुकानांवर छापे घातले. या दुकानांत इलेक्ट्रिक आणि बिगर-इलेक्ट्रिक खेळण्यांची प्रमाणित चिन्हाविना विक्री सुरु होती. केंद्र सरकारने खेळण्यांच्या दर्जाबाबत जारी केलेल्या गुणवत्ता नियंत्रण आदेशाचे यात उल्लंघन होत असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे यापुढे ग्राहकांनी खेळणी घेताना तपासायलाच हवीत, असे आवाहन केले जात आहे.
n या छाप्यादरम्यान अप्रमाणित खेळणी जप्त करण्यात आली. मुलांचे आरोग्य, सुरक्षितता लक्षात घेता केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे.
n त्यानुसार खेळण्यांवर भारतीय मानक ब्युरोचे सुरक्षितताविषयक प्रमाणपत्र आणि मार्क अनिवार्य आहे. सरकारने जारी केलेल्या गुणवत्ता नियंत्रण आदेशाचे उल्लंघन केल्यास हा दंडनीय अपराध आहे.
n त्यासाठी दोन वर्षापर्यंतचा तुरुंगवास किंवा किमान २ लाखापर्यंतचा दंड किंवा दोन्हीची तरतूद आहे. त्यामुळे खेळणी उत्पादक, वितरक आणि व्यापारी यांनी बीआयएसने प्रमाणित न केलेली खेळणी बनवू अथवा विकू नयेत.