Join us

टोल प्लाझा, चेकपोस्टवरच वाहनांची तपासणी करा; परिवहन आयुक्तांच्या अधिकाऱ्यांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 7:26 AM

आपत्कालीन परिस्थितीत कोणतेही वाहन थांबवावे लागल्यास ते शोल्डर लेनमध्ये नेले पाहिजे.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : समृद्धी महामार्गावर अलीकडेच झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर अपघात रोखण्यासाठी परिवहन विभागाने टोल प्लाझा किंवा चेकपोस्ट वगळता समृद्धी एक्स्प्रेस वेवर वाहने थांबवू नयेत, असे आदेश परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी आरटीओ अधिकाऱ्यांना दिले आहेत.

आपत्कालीन परिस्थितीत कोणतेही वाहन थांबवावे लागल्यास ते शोल्डर लेनमध्ये नेले पाहिजे. कोणतेही थांबलेले वाहन मागे इतर वाहनांना अडथळा आणणार नाही याची खात्री केली  पाहिजे. जेव्हा महामार्गावर कोणतेही वाहन थांबवले जाते, तेव्हा इतर वाहनांना अलर्ट करण्यासाठी रि-रिफ्लेक्टर असावेत. वाहनाच्या मागे त्रिकोण ठेवल्यामुळे मागून येणाऱ्या वेगवान वाहनाला इशारा मिळेल.

नोडल ऑफिसर नियुक्तअपघात रोखण्यासाठी नोडल ऑफिसर समृद्धी महामार्गाशी संबंधित ७  ते ८ यंत्रणा आहे. समृद्धी मार्गावरील होणारे अपघात रोखण्यासाठी सर्व यंत्रणा आपले काम करत होत्या. परंतु, त्यामध्ये समन्वय राखला जावा म्हणून आरटीओ अधिकारी राजाभाऊ गिते यांची नोडल ऑफिसर म्हणून नेमणूक केली आहे. - विवेक भीमनवार, परिवहन आयुक्त

वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कारवाई  समृद्धी महामार्गावरील ट्रक तपासणीचे आदेश कोणी दिले.   वरिष्ठ अधिकारी असताना कनिष्ठ अधिकारी कोणाच्या सांगण्यानूसार ट्रकवर कारवाई करण्यासाठी गेले या सगळ्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.   चौकशीत दोषी आढळल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांवर बढती रोखण्यासह निलंबानाची कारवाई करण्यात येणार आहे, असे परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

समृद्धी महामार्गावर आता इंटरसेप्टरची नजर   समृद्धी महामार्गावर एकूण १२८१ अपघात झाले असून, त्यामध्ये १२३ जणांनी आपला जीव गमावला आहे. यामध्ये बहुतांश अपघात भरधाव वाहन चालवणे हे कारण होते.   एमएसआरडीसीकडून गस्तीसाठी परिवहन विभागाला  ८ वाहने दिली होती. परंतु, त्याला स्पीडगन नव्हती.   वाहनाचा वेग तपासून त्यावर कारवाई व्हावी यासाठी आरटीओच्या ८ स्पीडगन समृद्धी महामार्गावर तैनात असणार आहेत.

टॅग्स :आरटीओ ऑफीस