चेतन ननावरे ल्ल मुंबईसराफा दुकानात १ मिलीग्रॅम ई व्हॅल्यू असलेला इलेक्ट्रॉनिक वजनकाटा नसल्यास सोने खरेदीवर आता प्रत्येक तोळ््यामागे ग्राहकांना कमाल १०० मिलीग्रॅमची सूट देण्याचा आदेश वैध मापन शास्त्र विभागाने दिला आहे. त्यामुळे १० मिलीग्रॅम ई व्हॅल्यू असलेला वजनकाटा वापरणाऱ्या सराफांच्या पेढीत सोने खरेदीवर ग्राहकांना सरासरी एका तोळ््यामागे २६० रुपयांची बचत होणार आहे. परिणामी ग्राहकांनी सोने खरेदी करताना त्याचे वजन करणाऱ्या काट्याची तपासणी नक्की करावी, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.याआधी प्रत्येक सराफाला १ मिलीग्रॅम ई व्हॅल्यू असलेला वजनकाटा वापरण्याचे आदेश विभागाने दिले होते. मात्र किरकोळ सराफांना १ मिलीग्रॅम ई व्हॅल्यूचे वजनकाटे विकत घेणे अधिक खर्चिक वाटत असल्याचे सांगण्यात आले. शिवाय पंख्याखाली हा वजनकाटा ठेवल्यास त्यांची अचूकता खंडीत होऊ शकते, म्हणून सराफा पेढीत एअर कंडीशनरची गरज भासणार होती. ग्रामीण भागात वीजेची चणचण असताना एसी लावणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य असल्याची समस्या सराफा संघटनेने व्यक्त केली होती. सराफांची तांत्रिक अडचण लक्षात घेता प्रशासनाने १ मिलीग्रॅम काटा न ठेवता १० मिलीग्रॅमचा वजनकाटा वापरणाऱ्या सराफांनी ग्राहकांना १० मिलीग्रॅमची सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. साधारणत: १ ग्रॅम सोनेखरेदीवर १० मिलीग्रॅमचा फरक पडतो. त्यामुळे एक तोळे सोने खरेदीवर ग्राहकांना १०० मिलीग्रॅमची सूट मिळणार आहे. सूट नाही तर करा तक्रार!सराफा पेढीत १ मिलीग्रॅम ई व्हॅल्यू काटा असलेल्या सराफा पेढीत ही सूट मिळणार नाही. मात्र १० मिलीग्रॅम ई व्हॅल्यू असलेल्या वजनकाट्यावर वजन केल्यानंतर सराफ ग्राहकांना १ ग्रॅम सोने खरेदीवर १० मिलीग्रॅमची सूट देत नसेल, तर ग्राहकांनी वैध मापन शास्त्र विभागाच्या ०२२-२२८८६६६६ या क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. शिवाय प्रत्येक सराफाने सूट देणारी नोटीस ठळकपणे प्रदर्शित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सोने घेताना काटा तपासा!
By admin | Published: March 28, 2015 12:41 AM