युरेनियम प्रकरणाच्या तपासाला कलाटणी!

By Admin | Published: December 31, 2016 02:15 AM2016-12-31T02:15:24+5:302016-12-31T02:15:24+5:30

युरेनियम जप्ती प्रकरणाच्या तपासाला एअर इंडियाने दिलेल्या नव्या माहितीमुळे कलाटणी मिळाली आहे. भंगारातील विमानात युरेनियम मिळाले होते, असा जबाब आरोपींनी नोंदविला होता.

Check for uranium matter! | युरेनियम प्रकरणाच्या तपासाला कलाटणी!

युरेनियम प्रकरणाच्या तपासाला कलाटणी!

googlenewsNext

- राजू ओढे, ठाणे
युरेनियम जप्ती प्रकरणाच्या तपासाला एअर इंडियाने दिलेल्या नव्या माहितीमुळे कलाटणी मिळाली आहे. भंगारातील विमानात युरेनियम मिळाले होते, असा जबाब आरोपींनी नोंदविला होता. एअर इंडियाने या जबाबाशी विसंगत माहिती दिली आहे.
ठाणे पोलिसांनी घोडबंदर रोडवरील एका हॉटेल परिसरात दोघांकडून २४ कोटी किंमतीचे ८ किलो ८६१ ग्रॅम वजनाचे डिप्लेटेड युरेनियम २0 डिसेंबर रोजी जप्त केले होते. पोलिसांनी याप्रकरणी सैफुल्ला वजाहतुल्ला खान (३७) आणि किशोर विश्वनाथ प्रजापती (५९) यांना अटक केली होती. इंडियन एअरलाईन्सने भंगारात काढलेल्या एका विमानातून हे युरेनियम मिळाले होते, अशी माहिती आरोपींनी दिली होती. आरोपींच्या जबाबानुसार ठाणे पोलिसांनी एअर इंडियाशी पत्रव्यवहार केला होता. इंडियन एअरलाईन्सचे विमान तयार करताना अशा प्रकारचे युरेनियम वापरले जाते का, या मुद्यावर पोलिसांनी एअर इंडियाकडे माहिती मागितली होती. ठाणे पोलिसांच्या या पत्राला उत्तर देताना, अशा प्रकारचे युरेनियम इंडियन एअरलाईन्सच्या विमानात वापरले जात नसल्याचे एअर इंडियाने स्पष्ट केले आहे. एअर इंडियाच्या या खुलाशामुळे आरोपींनी युरेनियम कुठून मिळवले, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. आरोपी किशोर प्रजापती हा भंगार व्यवसायिक आहे. दुसरा आरोपी सैफुल्ला वजाहतुल्ला खान हा प्रॉपर्टी एजंट असून, खाण व्यवसायाशीही संबंधित आहे.

एअर इंडियाने दिलेली माहिती आरोपींच्या जबाबाशी विसंगत आहे, हे खरे आहे. आरोपी २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत आहेत. त्यांनी खोटी माहिती का दिली, युरेनियम कुठून मिळवले, याबाबत चौकशी सुरू आहे.
- आशुतोष डुंबरे,
सह-पोलीस आयुक्त

Web Title: Check for uranium matter!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.