राज्यभरात जयजयकार, अमेरिकेतील दूतावासात शिवरायांचा जयघोष

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 02:36 AM2020-02-20T02:36:41+5:302020-02-20T02:37:50+5:30

शिवजन्मोत्सवाचा अपूर्व उत्साह : शाही मिरवणुका, रॅली, मर्दानी खेळ

Cheerleader statewide, Shivaray shout at US Embassy | राज्यभरात जयजयकार, अमेरिकेतील दूतावासात शिवरायांचा जयघोष

राज्यभरात जयजयकार, अमेरिकेतील दूतावासात शिवरायांचा जयघोष

Next

मुंबई : ढोल ताशांचा गजर, शिंग-तुतारीच्या ललकारी, अशा पारंपरिक थाटात बुधवारी राज्यात शिवजन्माचे स्वागत करत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव अपूर्व उत्साहात साजरा झाला. राज्यात ठिकाठिकाणी ढोल ताशाच्या गजरात शाही मिरवणुका काढण्यात आल्या. त्यामध्ये ऐतिहासिक वेशभूषेतील मावळे, घोडेस्वार सहभागी झाले होते. तलवारबाजी, दांडपट्टा, मल्लखांब अशा मर्दाने खेळांचेही प्रदर्शन घडवण्यात आले. महिलांनीही ठिकठिकाणी चांदीचा पाळणा बांधून बाळ शिवाजीच्या जन्मोत्सवाचे गुणगाण गायिले. कोल्हापूर व सातारा या संस्थानिकांच्या नगरीत शाही पध्दतीने शिवजन्माचे स्वागत करण्यात आले.

राज्यभर शिवरायांच्या पुतळ्यांभोवती आकर्षक विद्युत रोषणाई व सजावट करुन उत्साहात भर टाकली होती. घरासमोर घातलेल्या सडा -रांगोळ्यांनी अवघा महाराष्टÑ शिवजन्माच्या उत्साहात न्हाऊन निघाला होता. शिवजन्माचे पाळणे आणि शिवकिर्तीचे पोवाडे यांने वातावरण भारावून गेले होते. आज अनेक बालकांना त्यांच्या मातांनी शिवबाची वेशभूषा केली होती. छत्रपतींच्या वेशभूषेतील बालशिवाजी लक्ष वेधून घेत होते.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी गडावर जाऊन लाखो मावळ्यांसह शिवजन्मोत्सवात सहभाग घेतला. राज्यातील विविध गडांवर तरुणाईने आवर्जुन हजेरी लावली. विविध गडावर भ्रमंतीसाठी आलेल्या युवकांचे थवे दिसत होते.

अमेरिकेतील दूतावासात शिवरायांचा जयघोष

महाराष्ट्रातील तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग

गंगाराम पाटील ।

सांगली : अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील भारतीय वाणिज्य दूतावास ‘जय भवानी जय शिवाजी’च्या घोषणांनी दुमदुमून गेला. निमित्त होते शिवजयंतीचे. कोकरूड (ता. शिराळा) येथील डॉ. युनूस अत्तार यांच्यासह महाराष्ट्रातील तरुणांनी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करत शिवरायांचा जय जयकार केला.


छत्रपती फाऊंडेशन, भारतीय वाणिज्य दूतावास आणि अल्बानी ढोल-ताशा समूह यांनी संयुक्तपणे शिवजयंतीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, उद्योगपती मनोज शिंदे, भारतीय वाणिज्य दूतावासातील दूत ए. के. विजयकृष्णन् उपस्थित होते.
अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीय नागरिकांपैकी कोकरूड (ता. शिराळा) येथील डॉ. युनूस मुबारक अत्तार, कल्याण घोडे-पाटील (औरंगाबाद), सुरेश गायकवाड (तडवळे, शिराळा), स्वप्नील खेडेकर (पुणे), विनोद शिंदे (औरंगाबाद), विजय मानकर यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
शिवजयंती कार्यक्रमाला न्यूयॉर्क, न्यू जर्सी, कनेक्टिकट, पेनसिल्व्हेनिया आणि मॅसॅच्युसेट्स या सभोवतालच्या राज्यांतूनही शिवभक्त उपस्थित होते. यावेळी अल्बानी ढोल-ताशा समूहाच्या कलाकारांनी शिवजन्म, शिवराज्याभिषेकाचे प्रयोग सादर केले. अमेरिकेतील उद्योगपती आणि ‘कॉग्निजंट सॉफ्टवेअर’ समूहाचे सीईओ मनोज शिंदे यांनी अमेरिकन कॉर्पोरेट जगतातील भारतीयांच्या योगदानाचा गौरव केला. ए. के. विजयकृष्णन् यांनी, शिवजयंती साजरी करणारे आपले दूतावास अमेरिकेतील प्रथम वाणिज्य दूतावास असल्याबद्दल अभिमान व्यक्त केला.

Web Title: Cheerleader statewide, Shivaray shout at US Embassy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.