एसटी कर्मचाऱ्यांना बनविले आचारी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 06:26 PM2020-05-26T18:26:59+5:302020-05-26T18:27:17+5:30
आले एसटी बस चालवायला, बनवावे लागत आहे जेवण; रेशन देखील पुरवत नाही एसटी महामंडळ
मुंबई : लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा देण्यासाठी एसटी बस धावत आहेत. हि सेवा देण्यासाठी राज्यातील विविध विभागातून चालक दाखल झाले आहेत. मात्र या कर्मचाऱ्यांची राहण्याची आणि जेवण्याच्या सोयीचे तीनतेरा वाजले आहेत. एसटी बस चालवायला आलेल्या चालकांना स्वतःचे जेवण बनविण्याची वेळ आली आहे. कर्मचारी राहण्याच्या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सचा फज्जा उडालेला आहे.
राज्यभरातून आलेल्या चालकांची जेवणाची सोय करण्याचे आदेश एसटी महामंडळाकडून देण्यात आले होते. मात्र पनवेल मधील आगारातील कर्मचाऱ्यांना स्वतःचे जेवण स्वतः बनवावे लागत आहे. कर्मचाऱ्यांना यासाठी लागणारा किराणा सामान महामंडळाकडून मिळत नाही. गुरुद्वाराकडून किराणा सामान मिळत आहे. यातून एसटीचे कर्मचारी रोजचे जेवणाचा प्रश्न सुटत आहे, अशी माहिती कर्मचारी संघटनेने दिली.
लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतूक सेवा देण्यासाठी एसटी महामंडळाच्यावतीने मुंबई, पालघर, ठाणे या विभागातून बस चालवण्यात येत आहेत. आपल्या जिवाची पर्वा न करता एसटीचे चालक-वाहकअत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा देत आहेत. एसटीच्या या तिन्ही विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता भासू लागली होती. त्यामुळे एसटी महामंडळाने राज्यभरातून एसटीचे चालक वाहक मुंबई विभागात बोलावले होते. या तिन्ही विभागांच्या एसटी डेपोतच एसटी कर्मचारी राहतात. लॉकडाऊन’मुळे शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरन्ट्स आणि कँटिन बंद आहेत. कोरोनामुळे एसटीच्या अनेक डेपोतील कँटिन बंद आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या जेवणाची गैरसोय होत आहे. एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांच्या जेवणाची सोय केलेली नाही, असे कर्मचारी संघटनेचे म्हणणे आहे.
मुंबई सेंट्रल, कुर्ला-नेहरू नगर, परळ आगारात देखील अशीच अवस्था दिसून येत आहे. मात्र काही प्रमाणात या आगारात कर्मचाऱ्यांना जेवणाची सोय केली जात आहे. मात्र राहण्याची योग्य सोय केली गेली नाही. फिजिकल डिस्टन्स नियमाचे उल्लंघन करण्यात येत आहे. या संदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
----------------------------------
चालक-वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या जेवणाची सोय योग्यप्रकारे केली गेली नाही. एसटी महामंडळाकडून आदेश देण्यात आले आहेत की, कर्मचाऱ्यांच्या राहण्याची, जेवणाची योग्य सोय केली पाहिजे. मात्र त्याचे पालन करण्यात आले नाही. फिजिकल डिस्टन्स नियमांचा फज्जा उडालेला आहे.
- मुकेश तिगोटे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस टी वर्कर्स काँग्रेस (इंटक)
----------------------------------