Join us

चेंबूर परिसर ज्वालामुखीच्या तोंडावर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 1:52 AM

चेंबूर येथील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) प्लँटमध्ये बुधवारी लागलेल्या भीषण आगीमुळे या परिसरातील घातक परिस्थिती सर्वांसमोर आली आहे.

मुंबई : चेंबूर येथील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) प्लँटमध्ये बुधवारी लागलेल्या भीषण आगीमुळे या परिसरातील घातक परिस्थिती सर्वांसमोर आली आहे. या परिसरातील तेल शुद्धीकरण कारखाने व इतर तत्सम उद्योगांमुळे हा भाग जणू ज्वालामुखीच्या तोंडावर उभा आहे. त्यामुळे येथील धोकादायक परिस्थिती बदलण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी यासंदर्भात राज्य सरकारने त्वरित उपाययोजना आखण्याची मागणी केली आहे. ही आग अत्यंत दुर्दैवी असून यामध्ये जखमी झालेल्या व्यक्ती लवकर बऱ्या व्हाव्यात अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. चेंबूर, मानखुर्द, गोवंडी या परिसरात विविध रिफायनरींचे जाळे असल्याने हा परिसर अत्यंत धोकादायक झाला आहे. एखाद्या छोट्या दुर्घटनेमुळे हा परिसर बेचिराख होण्याची नेहमी भीती आहे. खरे पाहता असे उद्योग निर्मनुष्य ठिकाणी उभारण्याची गरज आहे. मात्र, मुंबईसारख्या शहरात तसे करणे शक्य नसल्याने नागरिक दाटीवाटीने या परिसरात राहत आहेत. त्यांच्यासाठी सुरक्षेच्या उपाययोजना आखण्याची गरज आहे.मात्र, सरकार त्याकडे दुर्लक्ष करून मुंबईतील विविध प्रकल्पग्रस्तांचे पुनवर्सन करण्यासाठी त्या नागरिकांना या परिसरात पाठवत आहे. सरकारची ही कृती अक्षम्य निष्काळजीपणाचा कळस आहे. त्यामुळे सरकारने विविध प्रकल्पग्रस्तांना या ठिकाणी पुनर्वसन करण्यासाठी पाठवून परिस्थितीत अधिक अडचणी निर्माण करू नयेत. नागरिकांना सुरक्षितता पुरवण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमावी व कार्यवाही करावी, असे आवाहन आनंदराज आंबेडकर यांनी केले आहे.

टॅग्स :बीपीसीएल आग