चेंबूरच्या दाम्पत्याची सेवा पाहून पोलीसही भारावले, दिवसाला १२० पोलिसांना चहा, नाष्ट्याची व्यवस्था
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 03:02 AM2020-07-08T03:02:40+5:302020-07-08T03:02:58+5:30
पोलिसांसाठी आपणही काहीतरी करायला हवे म्हणून चेंबूरच्या डिसुझा दाम्पत्याने चहा आणि नाष्टा देण्याचे ठरविले. गेले १०० दिवस ते दिवसाला १०० हून अधिक पोलिसांना चहा आणि नाष्टा पुरवत आहेत.
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात सामान खरेदीसाठी बाहेर पडले आणि रस्त्यावर नागरिकांच्या सेवेसाठी जीव धोक्यात घालून कर्तव्यावर असलेल्या पोलिसांकडे लक्ष गेले. आपणही त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवे म्हणून चेंबूरच्या डिसुझा दाम्पत्याने चहा आणि नाष्टा देण्याचे ठरविले. गेले १०० दिवस ते दिवसाला १०० हून अधिक पोलिसांना चहा आणि नाष्टा पुरवत आहेत. या दिवसांत त्यांचे पोलिसांसोबत एक भावनिक नाते तयार झाले आहे.
चेंबूर परिसरात रोजमोड डिसुझा आणि स्विटी डिसुजा राहण्यास आहेत. रोजमोड हे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर तर स्विटी या गृहिणी आहेत. मानखुर्द, चेंबूर, वडाळा या भागांत या दाम्पत्याच्या कार्याची सध्या चर्चा आहे. दुपारी ३ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत हे दाम्पत्य कारमधून चहा आणि नाष्टा घेऊन विविध नाकाबंदी पॉइंट्सवर जातात. पोलीसही त्यांच्या या वेळेत हजर असतात.
रोजमोड सांगतात, लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर आम्ही दोघे सामान खरेदीसाठी बाहेर पडलो. तेथे रस्त्यावर भर उन्हात तहान-भूक बाजूला ठेवून सेवा बजावत असलेल्या पोलिसांकडे लक्ष गेले. यांना धन्यवाद म्हणून यांच्यासाठी काहीतरी करायचे ठरवले. सुरुवातीला थंड पेय द्यायचे ठरविले. मात्र कोरोनामुळे ते योग्य नसल्याने घरचा आयुर्वेदिक चहा बनवून यासोबत खायला काहीतरी देण्याचे ठरविले. सुरुवातीला चेंबूर भागातूनच चहा आणि पराठा देण्यास सुरुवात केली. हळूहळू नाकाबंदी पॉइंट्स लक्षात आले. त्यानुसार, दुपारी १ वाजता मी आणि पत्नी चहा आणि नाष्टा बनवायला घेतो. पराठे होईपर्यंत ३ वाजतात. सगळं गाडीत भरून ज्या ठिकाणी कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे अशा ठिकाणी दिवसाला ८ ते १० नाकाबंदी पॉइंट्सवरील पोलिसांपर्यंत हा नाष्टा पोहोचविण्याचे काम करतो. लॉकडाऊनच्या काळात हा त्यांचा दिनक्रमच झाला आहे. दिवसाला किमान ११० ते १२० पोलिसांपर्यंत त्यांचा हा नाष्टा पोहोचतो.
आपण दुसऱ्यांसाठीही थोडा पुढाकार घेतल्यास एक वेगळेच समाधान मिळते. योग्य वेळी योग्य मदत पोहोचविणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे ते सांगतात.
पोलिसांकड़ून चित्र, पत्राद्वारे सलामी, कौतुक
पोलिसांकड़ूनही वेळोवेळी टाळ्या वाजवून, पत्र, चित्राद्वारे त्यांच्या कार्याला सलाम केला गेला आहे. गेले १०० दिवस त्यांच्या या अविरत सेवेमुळे पोलिसांसोबत त्यांचे एक अनोखे भावनिक नाते तयार झाले आहे. एका पोलिसाने कुटुंबीयांसाठी आणलेली आंब्याची पेटी डिसुझा यांना दिली, हा अनुभव सांगतानाही रोजमोड भावुक झाले होते.
कार्य करताना कोरोनाची भीती नाही
रोजमोड यांच्या मते अशी सेवा करताना कोरोनामुळे मृत्यू ओढवला तरी चालेल, आमच्याकड़ून ही मदत सुरूच राहणार आहे.
चक्रीवादळातही मदतकार्य सुरूच
चक्रीवादळाची वेळ आणि यांच्या चहा-नाष्टा वाटपाची वेळ एकच असल्याने त्यांनी आपल्या सेवेत खंड पडू नये म्हणून पहाटे लवकर उठून नाष्टा तयार करीत सकाळीच पोलिसांपर्यंत पोहोचविला होता.