Join us

मुलीला कुशीत घेत सुटकेचा जीवघेणा थरार; रणदिवे कुटुंबाच्या समोर उभा होता मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2024 5:21 AM

पोटमाळ्याच्या शिडीवरून खाली उतरून दरवाजा उघडला, मात्र दारातही आग होती. बाहेर पडण्याचा मार्ग नव्हता. क्षणभर काय करावे सुचले नाही. मुलगीही घाबरली. अखेर तिला गच्च मिठीत घेत आगीच्या तांडवातून उड्या घेत निसटले.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: नुकताच डोळा लागला होता, पहाटे "पळा पळा"च्या आरोळ्यांनी जाग आली. घरात पती आजारी. त्यात सात वर्षांची मुलगी आणि दीर. दारात येणार तोच आगीच्या भडक्यामुळे बाहेर पडण्याचा मार्ग बंद झाला. घराच्या भिंतींना तडे जायला लागले. मृत्यू समोर दिसत होता. मुलीला घट्ट मिठी मारली आणि आगीच्या ज्वाळांतून उड्या घेत बाहेर पडलो, असा सुटकेचा थरारक अनुभव गुप्ता कुटुंबीयांच्या शेजारी कमल रणदिवे यांनी कथन केला.

रणदिवे आणि गुप्ता कुटुंबीयांच्या घराची भिंत सामाईक. त्यामुळे या दुर्घटनेतून हे कुटुंब थोडक्यात बचावले. कमल म्हणाल्या, 'रात्री उशिरापर्यंत माझ्या मुलीसोबत गुप्ता कुटुंबीयांची मुलगी खेळत होती. तिच्या आईनेच माझ्या मुलीला आपल्या मुलीसोबत खेळण्यासाठी बोलावून घेतले होते. उशिरापर्यंत घराबाहेरच नेहमीप्रमाणे त्या मस्ती करीत होत्या. पहाटे झोप लागली आणि अचानक उष्णता जाणवायला लागली. वातावरणामुळे असेल म्हणून दुलक्ष दुर्लक्ष केले. पण काही वेळाने आरोळ्या ऐकू आल्या. बाहेर पाहिले तर आगीचे लोळ गुप्ता कुटुंबाच्या घराच्या वरच्या मजल्यापर्यंत पोहोचले होते.'

दारात आग जिभल्या चाटत होती...

पोटमाळ्याच्या शिडीवरून खाली उतरून दरवाजा उघडला, मात्र दारातही आग जिभल्या चाटत होती. बाहेर पडण्याचा मार्ग नव्हता. क्षणभर काय करावे सुचले नाही. मुलगीही घाबरली. अखेर तिला गच्च मिठीत घेत आगीच्या तांडवातून उड्या घेत निसटले. डोळ्यापुढे फक्त अंधारी होती. नेमके काय झाले कळलेच नाही, असे रणदिवे म्हणाल्या.

रात्रीचे बोलणे अखेरचेच ठरले 

गुप्ता कुटुंबीयांचे घर पूर्णपणे आगीच्या विळख्यात सापडले होते. आम्हाला फक्त आगीच्या ज्वाला दिसत होत्या. रात्री गुप्ता कुटुंबीयांशी झालेले बोलणे अखेरचे ठरेल, असे स्वप्नात देखील वाटले नव्हते, असे सांगताना रणदिवे यांचे अश्रू अनावर झाले. रणदिवे यांच्या घराच्या भिंतींना तडे गेले आहेत. त्याहीपेक्षा त्या मनाने खचल्या आहेत. 

टॅग्स :चेंबूरआग