डोळ्यादेखत अख्खं कुटुंब जळालं; किंकाळ्यांनी हादरला परिसर, रहिवाशांमध्ये माजला हलकल्लोळ

By मनीषा म्हात्रे | Published: October 7, 2024 05:27 AM2024-10-07T05:27:03+5:302024-10-07T05:28:57+5:30

डोळ्यादेखत त्यांची पत्नी, एक मुलगा, दोन सुना, तीन नातवंडे आगीच्या विळख्यात ओढली गेली. एकाच कुटुंबातील सात जणांचा बळी गेल्याने गजबजलेल्या परिसरात स्मशानशांतता पसरली.

chembur fire case whole family burned before the eyes and screams shook the area | डोळ्यादेखत अख्खं कुटुंब जळालं; किंकाळ्यांनी हादरला परिसर, रहिवाशांमध्ये माजला हलकल्लोळ

डोळ्यादेखत अख्खं कुटुंब जळालं; किंकाळ्यांनी हादरला परिसर, रहिवाशांमध्ये माजला हलकल्लोळ

मनीषा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : रात्रीचे जेवण उरकून चेंबूरचे गुप्ता कुटुंबीय झोपी गेले होते. पहाटेच्या सुमारास ७० वर्षांचे आजोबा नैसर्गिक विधीसाठी उठले होते. त्याचवेळी घरात आग लागल्याचे त्यांनी पाहिले आणि सर्वांना जागवण्यासाठी किंकाळी फोडली. त्यांच्या मोठ्या मुलाने त्यांना तत्काळ घराबाहेर काढले, पण बाप-लेकाने मागे वळून बघितले असता आगीने संपूर्ण घराला कवेत घेतले होते. गुप्ता कुटुंबीयांच्या किंकाळ्यांनी चेंबूरचा सिद्धार्थ कॉलनी परिसर हादरला. बघताबघता कुटुंबातील तीन लहान मुलांसह सात जणांचा कोळसा झाला. या दुर्घटनेने आसापासचा परिसर सुन्न झाला आहे.

चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीतील दुमजली घरात छेदिराम अलगुराम गुप्ता आणि गीतादेवी गुप्ता हे दाम्पत्य मुलगा प्रेम आणि धर्मदेव, सुना अनिता आणि मंजू, नातवंडे विधी, नरेंद्र, प्रीती यांच्यासह राहत होते. गुप्ता कुटुंब ५० वर्षांपासून या ll goga परिसरात राहते. छेदिराम यांचे तळ मजल्यावर किराणामालाचे दुकान होते, तर वरच्या मजल्यावर एकत्र कुटुंब राहत होते. किराणा मालाच्या दुकानातील रॉकेलनेच घात केला.

जीव वाचवण्यासाठी...

आग भडकून आणखी अनर्थ ओढवू नये म्हणून स्थानिक तरुणांनी शेजारच्यांसह आजूबाजूचा परिसर रिकामा केला. बाहेर पडण्याचा एक मार्ग बंद झाल्याने घरातील मुला- बाळांसह ज्येष्ठांना बाहेर काढण्यासाठी एकच हल्लकल्लोळ माजला. चाळीतील अनेक कुटुंबीय जीव मुठीत घेऊन घरांबाहेर धावल चेंबूर पोलिस, अग्निशमन दलाचे जवानही दुर्घटनास्थळी निघाले, पण रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वाहनांमुळे त्यांच्या गाड्या पोहोचायला उशीर झाला.

स्मशानशांतता पसरली!

स्थानिक तरुणांच्या मदतीने अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रणाचा शर्तीचा प्रयत्न केला. जवळपास दीड ते दोन तास आगीचा थरार सुरु होता. छेदिराम यांच्या डोळ्यादेखत त्यांची पत्नी, एक मुलगा, दोन सुना, तीन नातवंडे आगीच्या विळख्यात ओढली गेली. ते आणि त्यांच्या एका मुलाच्या हाती हतबल होऊन पाहणे आणि आक्रोश करण्याशिवाय काहीही नव्हते. कुटुंबीयांच्या किंकाळ्यांनी संपूर्ण परिसर हादरला. एकाच कुटुंबातील सात जणांचा बळी गेल्याने गजबजलेल्या परिसरात स्मशानशांतता पसरली.

बाप आणि मुलगा बचावला 

शनिवारी रात्री गुप्ता कुटुंबीयांनी नेहमीप्रमाणे एकत्रित जेवण केले आणि मुलांसह झोपी गेले. पहाटे सर्वजण साखर झोपेत असतानाच छेदिराम यांना नैसर्गिक विधीसाठी जाग आली तेव्हा घरात आग लागली होती. त्यांनी आरडाओरडा करताच मोठा मुलगा धर्मदेवने सर्वांना जागे केले आणि तो वडिलांना घेऊन घराबाहेर धावला. पण मुलांसह बाकीचे सर्व बाहेर पडण्याआधीच तळ मजल्यावरच्या रॉकेलच्या साठ्याचा भडका उडाला. काही क्षणात आगीचा लोळ उठला आणि त्याने गुप्ता कुटुंबातील सात जणांना गिळंकृत केले.

मागच्या घराचे पत्रे, भिंत तोडून बचावकार्य...

गुप्ता कुटुंबीयांचे घर चहूबाजूंनी आगीने वेढल्याने आगीत सापडलेल्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचणे शक्य नव्हते. अशावेळी अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक तरुणांनी पाठीमागील घराचे पत्रे, भितीचा काही भाग तोडून गुप्ता कुटुंबीयांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. आग लागताच चाळीतल्या तरुणांनी सर्व रहिवाशांना जागे केले. गुप्ता कुटुंबीयांच्या मागच्या बाजूला असलेल्या ५० हून अधिक घरांना आगीची झळ बसण्यापूर्वीच तरुणांनी ती रिकामी केली. सर्व चाळकऱ्यांना मुख्य रस्त्यावर आणले गेले. गुप्ता कुटुंबीयांच्या बचावासाठी पाठीमागच्या घराचे पत्रे आणि भिंत तोडून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. चार वर्षांच्या मुलीला बाहेर काढले. एका तरुणाने तिला खांद्यावरून रुग्णालयात नेले. मात्र, तेथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

 

Web Title: chembur fire case whole family burned before the eyes and screams shook the area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.