मुंबई - नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक सदरुद्दीन खान (५०) यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी मुख्य शूटरसह दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अफसर खान (२०) आणि फिरोज बद्रुद्दीन खान (५४), अशी अटक आरोपींची नावे आहेत. मालमत्तेच्या वादातूनच गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.
खान यांचा एफ. एस. के. बिल्डर नावाने जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. खान बुधवारी कामानिमित्त मुंबईत आले होते. ते लॅन्ड रोव्हर डिफेन्डर कारने घरी जात असताना चेंबूरच्या डायमंड गार्डन सिग्नलवर त्यांच्या कारवर बेछूट गोळीबार करण्यात आला. त्यात खान जबर जखमी झाले. चेंबूर पोलिसांनी खान यांचा सुरक्षा रक्षक सिद्दीकी यांची फिर्याद नोंदवून घेतली. खान यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या आरोपी अफसर खान याला परिमंडळ सहाच्या पथकाने धारावीतून अटक केली. सांताक्रूझमधील रहिवासी असलेल्या आरोपी फिरोज खान याचा गुन्ह्यातील सहभाग समोर येताच गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा माग काढत मीरा रोडमधील नयानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून त्याला बेड्या ठोकल्या आहेत.