लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : चेंबूर येथील ‘हिट अँड रन’च्या गुन्ह्यात अटक केलेला काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हंडोरे यांचा मुलगा गणेश हंडोरे याला उच्च न्यायालयाने बुधवारी अंतरिम दिलासा दिला. गणेश हंडोरे याला ५ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी अटक केली होती. त्याच्यावरील प्रारंभीचे आरोप जामीनपात्र होते. मात्र, कालांतराने त्याच्यावर बीएनएस- कलम ११० (सदोष मनुष्यवध) लावल्याने त्याला जामीन मिळणे कठीण झाले होते. दरम्यान, आरोपीची प्रकृती ढासळलेली असल्याने याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी विनंती गणेशच्या वकिलांनी न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाला केली.
चेंबूर पोलिसांनी गणेशला अटक करताना बीएनएस कलम ३५ अंतर्गत नोटीस बजावली नाही. त्याला अटकेचे कारण सांगण्यात न आल्याने त्याची अटक बेकायदा आहे. तसेच त्याच्यावर लावलेले कलम ११० रद्द करावे, अशी मागणी ज्येष्ठ वकील राजीव चव्हाण यांनी न्यायालयाकडे केली.
यापूर्वी फेटाळला होता जामीन
५ ऑक्टोबर रोजी गणेश हंडोरे हा होंडा ॲकॉर्ड ही गाडी चालवत असताना त्याने एका पादचाऱ्याला धडक दिली. यावेळी गाडी थांबविण्याऐवजी तो घटनास्थळावरून फरार झाला होता. पोलिसांनी तपासाअंती त्याला अटक केली. गेल्याच आठवड्यात सत्र न्यायालयाने आरोपीची जामिनावर सुटका केल्यास तो साक्षीदारांवर दबाव आणू शकतो, असे म्हणत त्याचा जामीन अर्ज फेटाळला होता.
‘हा कलमाचा गैरवापर’
‘हे प्रकरण बेदरकारपणे वाहन चालविण्याचे असून, त्याने मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविलेले नाही. त्यामुळे ११० कलम लागू केल्यास अपघाताच्या सर्व प्रकरणांसाठी हे कलम लागू करावे लागेल. कलमाच्या गैरवापराचे हे उत्तम उदाहरण आहे,’ असे सांगत न्यायालयाने आरोपीला अंतरिम दिलासा दिला.