Join us

चेंबूरमध्ये मनसे, राष्ट्रवादीला भोपळा

By admin | Published: February 25, 2017 3:32 AM

संमिश्र लोकवस्ती असलेल्या चेंबूर परिसरात भाजपाचे वर्चस्व वाढताना पाहायला मिळत आहे. २०१२ ला एम पश्चिम विभागातून भाजपाचे दोन नगरसेवक निवडून आले होते

मुंबई : संमिश्र लोकवस्ती असलेल्या चेंबूर परिसरात भाजपाचे वर्चस्व वाढताना पाहायला मिळत आहे. २०१२ ला एम पश्चिम विभागातून भाजपाचे दोन नगरसेवक निवडून आले होते. मात्र या वेळी ही संख्या चार झाली आहे. काँग्रेसला येथे फटका बसला असून तीनपैकी केवळ एकच जागा काँग्रेसने राखली आहे, तर मनसे आणि राष्ट्रवादीला या वेळेसही खाते खोलता आलेले नाही.पूर्वी आठ प्रभाग असलेल्या एम पश्चिम विभागात २०१२ ला शिवसेनेचे ३, काँग्रेस ३ आणि भाजपाचे २ नगरसेवक निवडून आले होते. मात्र सध्या केवळ सातच प्रभाग या वॉर्डात शिल्लक राहिल्याने येथील चुरस अधिकच वाढली होती. त्यातच या वेळेस सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवत असल्याने कोण बाजी मारणार, हे शेवटच्या क्षणापर्यंत समोर येत नव्हते. १५२, १५४ आणि १५५ या तीन प्रभागांमध्ये मोठी लढत झाली. १५२ मध्ये भाजपाकडून आशा मराठे, सेनेकडून सोनाली साळवी, रिपाइंकडून सुनील बनसोडे आणि भारिपकडून विशाल मोरे हे तीन तगडे उमेदवार रिंगणात होते. मात्र यामधून भाजपाच्या आशा मराठे यांनी बाजी मारली. १५४ मध्येदेखील भाजपा उमेदवार महादेव शिगवण यांच्यासमोर काँग्रेसचे माजी नगरसेवक किसन मिस्त्री यांचा मुलगा अभिषेक मिस्त्री, सेनेचे शेखर चव्हाण आणि राष्ट्रवादीचे विजय भोसले हे रिंगणात होते. मात्र त्यांनीदेखील या ठिकाणी या सर्वांना मागे टाकत विजय मिळवला आहे, तर १५५ मधून काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र माहुलकर यांनी राजेंद्र नगराळे यांना या प्रभागातून उमेदवारी दिली होती. त्यांच्यासमोर सेनेचे श्रीकांत शेट्ये, मनसेचे उत्तम दुनबळे आणि भारिपच्या प्रवीण पोल यांचे आव्हान होते. राजेंद्र माहुलकर गेल्या २० वर्षांपासून सातत्याने या प्रभागातून जिंकून येत असल्याने या प्रभागातून काँग्रेसच जिंकून येणार, असे भाकीत सर्वच जण वर्तवत होते. मात्र सेनेच्या श्रीकांत शेट्ये यांनी यामध्ये मुसंडी मारत विजय मिळवला आहे. (प्रतिनिधी)१५० मध्ये घोळ झाल्याचा आरोपचेंबूरच्या पी.एल. लोखंडे मार्गावरील प्रभाग क्रमांक १५० मध्ये मतदानाच्या दिवशीदेखील काही उमेदवारांनी आक्षेप घेतला होता. मतदान करण्याची वेळ साडेपाचची असताना या ठिकाणी साडेसात वाजेपर्यंत मतदान केल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे.या प्रभागातून माजी आमदार आणि माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या पत्नी संगीता हंडोरे या काँग्रेसमधून निवडणूक लढवत होत्या. मतमोजणीच्या दिवशीदेखील या उमेदवारांनी गोंधळ घालत तीन तास मतमोजणी बंद पाडली होती. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात झाली. या वेळेसदेखील या प्रभागातून संगीता हंडोरे याच विजयी झाल्या आहेत. भाजपा उमेदवाराने अखेर मारली बाजीपालिका निवडणुकीत भाजपा-रिपाइंची युती असताना चेंबूरच्या प्रभाग क्रमांक १५२ मधून भाजपासह रिपाइंनेदेखील उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अखेरपर्यंत यातील एकानेही अर्ज मागे न घेतल्याने दोघांमध्ये मोठी टक्कर होती. भाजपा उमेदवार आशा मराठे यांनी अर्ज मागे घ्यावा यासाठी त्यांच्यावर रिपाइंकडून मोठ्या प्रमाणात दबाव टाकण्यात येत होता. मात्र त्यांनी याला न जुमानता प्रचार सुरूच ठेवला. एकीकडे त्यांना शिवसेना तर दुसरीकडे रिपाइं अशा दोन्ही पक्षांना टक्कर द्यायची होती. त्यामुळे त्यांनी घरा-घरात प्रचार केला आणि त्या विजयीदेखील झाल्या. या प्रभागातून त्यांना ७७१५ मते मिळाली.गेल्या २० वर्षांपासून एम पश्चिम वॉर्डातील प्रभाग क्रमांक १५१ मध्ये गौतम साबळे हेच एकमेव नगरसेवक म्हणून निवडून येत होते. काही वर्षे रिपाइंमध्ये असलेल्या साबळेंनी सहा-सात वर्षांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांना या परिसरात कोणीही टक्कर देणारा तगडा उमेदवार नसल्याने आपला विजय शंभर टक्के असल्याचा त्यांचा दावा होता.मात्र २० वर्षांनंतर या परिसरात बदल घडला असून परिसराचे नेतृत्व करण्यासाठी राजेश फुलवारीया हा तरुण नगरसेवक या ठिकाणी निवडून आला आहे. मारवाडी समाजाची या ठिकाणी मोठी लोकवस्ती असल्याने याच लोकांची मते महत्त्वाची ठरली आहेत. त्यामुळे फुलवारीया यांना या प्रभागातून एकूण ९९७२ मते पडली. तर साबळे यांना केवळ ५२९५ मते पडली आहेत. त्यामुळे येथे विजयोत्सव साजरा करण्यात आला.