- समीर कर्णुक, मुंबई
स्थानिक भक्कम उमेदवार मिळत नसल्याने, चेंबूरमधील प्रभाग क्रमांक १५४साठी आता सर्वच पक्षांनी बाहेरील उमेदवारांचा शोध सुरू केला आहे. मात्र, यातदेखील एकाच पक्षातून तीन ते चार जण इच्छुक असल्याने, नेमकी उमेदवारी द्यायची कोणाला, असा प्रश्न पक्षश्रेष्ठींना पडला आहे. पालिकेच्या एम पश्चिम विभागामध्ये येणाऱ्या प्रभाग क्रमांक १५४मध्ये सिंधी सोसायटीचा काही भाग, साठेनगर, कोकणनगर, कलेक्टर कॉलनी आणि रामटेकडीच्या काही भागाचा समावेश आहे. पूर्वीच्या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाल्याने, या ठिकाणी सर्वच पक्ष भक्कम उमेदवाराच्या शोधात आहेत. सेनेकडून दोन ते तीन शाखाप्रमुखांच्या नावाची चर्चा आहे, तर भाजपाकडून स्थानिक नगरसेवकाला डावलून थेट जिल्हाध्यक्षांनीच दंड थोपटले आहेत. काँग्रेसकडून एक माजी नगरसेवक त्यांच्या मुलाला तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, हे सगळेच इच्छुक उमेदवार बाहेरील आहेत. (प्रतिनिधी) शौचालय, वाहतूककोंडीची मोठी समस्या या प्रभागांमध्ये विजयनगर, कोकणनगर आणि साठेनगर असा मोठा झोपडपट्टी परिसर आहे. मात्र, या ठिकाणी सार्वजनिक शौचालयांची मोठी कमतरता आहे. त्यामुळे या रहिवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. याशिवाय या परिसरात वाहतूककोंडीची समस्यादेखील मोठी आहे. अनेक ठिकाणी पुनर्विकासाची कामेदेखील अर्धवट आहेत.