मुंबई :
चेंबूर येथील आणिक गाव महापालिका शाळेत पोषण आहारातून झालेल्या विषबाधाप्रकरणी आहारपुरवठादार शांताई महिला औद्योगिक सहकारी संस्थेला पालिकेच्या प्रयोगशाळेने क्लीन चिट दिली आहे. या प्रयोगशाळेत खाद्यपदार्थांचे नमुने तपासण्यात आले असता त्यात दोष नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, सरकारी प्रयोगशाळेतून आणखी एक अहवाल आल्यानंतर अंतिम निष्कर्ष काढण्यात येईल.
विद्यार्थ्यांच्या घशातील स्रावाचे नमुने कुलाबा येथील सरकारी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून, या तपासणीचा अहवाल आल्यानंतर विद्यार्थ्यांना विषबाधा कशामुळे झाली, यावर प्रकाश पडेल. आणिक गाव येथील पालिकेच्या शाळेत नऊ दिवसांपूर्वी माध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर काही विद्यार्थ्यांना उलटी झाली आणि त्रास सुरू झाला.
सर्व विद्यार्थ्यांना गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शांताई महिला औद्योगिक सहकारी संस्थेकडील खाद्यपदार्थांचे नमुने पालिकेच्या दादर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. प्रयोगशाळेत मसूरची आमटी, भात, मूग, चणे, वाटाणे या नमुन्यांची तपासणी केली असता काही दोष आढळले नसल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. विषबाधेच्या प्रकारानंतर शांताई महिला औद्योगिक सहकारी संस्थेचे काम थांबवण्यात आले होते.