Join us  

चेंबूर स्थानकाबाहेरील फेरीवाल्यांना पालिका हटवणार

By admin | Published: May 24, 2014 2:21 AM

चेंबूर स्थानकाबाहेरच्या रस्त्यावर बसणार्‍या सुमारे १०० हून अधिक फेरीवाल्यांमुळे या परिसरात कायमस्वरूपी पाहावयास मिळणारे ट्रॅफिक जाम आणि गर्दीचे चित्र पुढच्या काही दिवसांतच पालटणार

मुंबई : चेंबूर स्थानकाबाहेरच्या रस्त्यावर बसणार्‍या सुमारे १०० हून अधिक फेरीवाल्यांमुळे या परिसरात कायमस्वरूपी पाहावयास मिळणारे ट्रॅफिक जाम आणि गर्दीचे चित्र पुढच्या काही दिवसांतच पालटणार आहे. फेरीवाल्यांविरोधात महापालिकेने हाती घेतलेल्या मोहिमेंतर्गत चेंबूर स्थानकाबाहेरील फेरीवाल्यांना हटवण्यात येणार आहे. संध्याकाळी चेंबूर स्थानकाबाहेर पडल्यावर चालायला किंवा उभे राहायलाही जागा नसते. गर्दीच्या वेळी या परिसरातून वाहनांची ये-जा सुरू असते. यामुळे येथील रहिवाशांना नेहमीच त्रास सहन करावा लागतो. रहिवाशांच्या बरोबरीनेच या परिसरातील दुकानदारही फेरीवाल्यांमुळे त्रस्त झाले आहेत. फेरीवाले दुकानासमोरच आपले बस्तान थाटून बसत असल्याने दुकानामध्ये जाण्यासाठी रस्ता राहत नाही. या त्रासाला कंटाळून नागरिक आणि दुकानदारांनी या अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात महापालिकेकडे अनेक तक्रारी केल्या आहेत. एम वेस्टच्या साहाय्यक पालिका आयुक्तांनी याच तक्रारींवरून फेरीवाले हटाव मोहीम हाती घेतली आहे. सर्व फेरीवाले हटवल्याशिवाय ही मोहीम बंद करण्यात येणार नसल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली. या परिसरात इतक्या प्रमाणात फेरीवाल्यांमध्ये वाढ झाली आहे की, या परिसरातील सिग्नलसुद्धा दिसत नाहीत. झाडांचा आधार घेऊन फेरीवाले बांबूच्या साहाय्याने विक्री सामान लावत असल्याने या परिसरातील काही झाडांचेही नुकसान झाले आहे. फेरीवाले अशा प्रकारे आपली दुकाने थाटत असल्यामुळे येथील दुकानदारांचेही नुकसान होत आहे. फेरीवाल्यांमुळे दुकानामध्ये नेहमी येणारी गिºहाईकेही ट्रॅफिक आणि गर्दीला कंटाळून येथे येणे टाळत असल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे. मात्र काही दुकानदार या फेरीवाल्यांकडून पैसे घेत असल्यामुळे ते याबाबतीत काहीच बोलत नाहीत. महापालिकेचे अधिकारी या परिसरात आल्यावर काही दुकानदार फेरीवाल्यांना सामान ठेवण्यासाठी जागा देतात. मात्र काही दिवसांतच अनधिकृत फेरीवाल्यांना या परिसरातून हटवण्यात येणार असल्याचे पालिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले.(प्रतिनिधी)