चेंबूरच्या पोटनिवडणुकीत ४७.०८ टक्के मतदान
By Admin | Published: January 11, 2016 02:29 AM2016-01-11T02:29:14+5:302016-01-11T02:29:14+5:30
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, चेंबूरमधील बोरला घाटला व्हिलेज प्रभाग क्रमांक १४७च्या पोटनिवडणुकीअंतर्गत रविवारी एकूण ४७.०८ टक्के मतदान झाले.
मुंबई : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, चेंबूरमधील बोरला घाटला व्हिलेज प्रभाग क्रमांक १४७च्या पोटनिवडणुकीअंतर्गत रविवारी एकूण ४७.०८ टक्के मतदान झाले. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून चेंबूर पूर्वेकडील चेंबूर नाका महापालिका शाळेत मतमोजणी होणार आहे. काँगे्रस आणि
शिवसेना या पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. काँग्रेसकडून राजेंद्र नगराळे, शिवसेनेकडून अनिल पाटणकर आणि अपक्ष उमेदवार नागेश तवटे या तिघांमध्ये ही लढत आहे.
प्रभाग क्रमांक १४७ या एका जागेकरिता एकूण ६ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, एकूण ३९ मतदार केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीमध्ये एकूण ४५ हजार ७३२ मतदारांपैकी २१ हजार ५३१ जणांनी मतदान केले असून, ही टक्केवारी ४७.०८ इतकी आहे. एकूण २५ हजार १०० पुरुष मतदारांपैकी ११ हजार ८५३, तर एकूण २० हजार ६३१ स्त्री मतदारांपैकी ९ हजार ६७८ स्त्रियांचा यामध्ये समावेश आहे. रविवारच्या मतदानासाठी मतदार उत्साहाने सकाळीच घराबाहेर पडल्याने विपरीत घटना होऊ नये, म्हणून पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. परिणामी, येथे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. (प्रतिनिधी)