Join us

चेंबूरच्या माँ रुग्णालयात रंगतात दारूपार्ट्या

By admin | Published: August 13, 2015 11:44 PM

रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना कुठल्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये, यासाठी रुग्णालय परिसर स्वच्छ ठेवणे बंधनकारक आहे. मात्र चेंबूरमधील माँ रुग्णालयात हे सर्व नियम धाब्यावर बसवले जात

मुंबई : रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना कुठल्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये, यासाठी रुग्णालय परिसर स्वच्छ ठेवणे बंधनकारक आहे. मात्र चेंबूरमधील माँ रुग्णालयात हे सर्व नियम धाब्यावर बसवले जात आहेत. या रुग्णालयात रोजच मांसाहरी जेवण बनवून कर्मचारी या ठिकाणी बिनधास्तपणे दारूच्या पार्ट्या करत असतात. याबाबत अनेक तक्रारी करूनदेखील कारवाई होत नसल्याने रुग्णांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.चेंबूर परिसरात माँ रुग्णालय हे पालिकेचे एकमेव रुग्णालय आहे. त्यामुळे या ठिकाणी रोजच रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मात्र सध्या या रुग्णालयात योग्य उपचार मिळत नसल्याने रुग्णांनी रुग्णालयाकडे पाठ फिरवली आहे. याचाच फायदा घेत येथील कर्मचारी आणि डॉक्टर रुग्णालयातच पार्ट्या करत असतात. रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभाग हा सर्वांत महत्त्वाचा असतो. रुग्णांना कुठल्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये, यासाठी या विभागामध्ये नेहमीच स्वच्छता असते. मात्र माँ रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टर हे सर्व नियम धाब्यावर बसवत याच विभागामध्ये मांसाहारी जेवण शिजवात. त्यामुळे याचा मोठा परिणाम रुग्णांवर होत असल्याचा आरोप काही रहिवाशांनी केला आहे. याहून आश्चर्याची बाब म्हणजे येथील अनेक कर्मचारी हे याच विभागात सर्रास दारूच्या पार्ट्या करतात. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशिवाय या विभागात कोणीही फिरकत नाही. त्यामुळे बिनधास्तपणे पार्ट्या दिवसाही या विभागात केल्या जातात. रात्री ११ नंतर तर या ठिकाणी दारूसह जुगाराचे अड्डेदेखील सुरू असतात. त्यामुळे रात्रीच्या वेळेस कोणीही रुग्ण गंभीर अवस्थेत या ठिकाणी आल्यास त्याला पाहण्याआधीच रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टर सायन अथवा राजावाडी रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला देत हात वर करतात. तसेच क्ष-किरण विभागात आणि कर्मचारी खोलीमध्येदेखील चिकन आणि दारूच्या पार्ट्या राजरोसपणे केल्या जातात. याबाबत काही रहिवाशांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारीदेखील केल्या आहेत. मात्र त्यांच्याकडून काहीच कारवाई केली जात नाही. त्यामुळे दिवसेंदिवस या ठिकाणी कर्मचारी आणि डॉक्टरांची मुजोरी वाढत चालली आहे. त्यामुळे अशा लोकांवर कारवाई करावी, अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे. (प्रतिनिधी)