मुंबई ही खऱ्या अर्थाने उद्यमनगरी आहे. चाकोरी सोडून एखाद्याने वेगळा व्यवसाय थाटला तरी त्याला इथे भरभरून दाद मिळते. ही कहाणीदेखील एका अशाच उच्चशिक्षित तरुणाची आहे. पानाची गादी म्हटले की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो कोपऱ्यावरचा गुटखा आणि सिगारेट विकणारा पानवाला. मात्र चेंबूरमधील या तरुणाने या चाकोरीबद्ध पानशॉपला छेद देत एक वेगळा प्रयोग केला. शक्कल लढवत त्याने थेट एअरकंडिशन पानाचे दुकान थाटले. या पानशॉपची खासियत म्हणजे या दुकानात ८०पेक्षा अधिक पानाचे प्रकार उपलब्ध असून हे पान ५ वर्षांच्या मुलापासून ते वृद्धदेखील खाऊ शकतात. कारण या पानामध्ये तंबाखूचा एक कणदेखील घातला जात नाही.चेंबूरच्या सिंधी सोसायटीत राहणाऱ्या मोहित माकन (२७) या तरुणाने सर्व कुटुंबीयांना एकत्रित घेऊन फॅमिली पानाची कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा ध्यास घेतला. सुरुवातीला मोहितने ही कल्पना वडील किशोर माकन यांना सांगितली. मुलगा काही तरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय, हे पाहून त्यांनीदेखील त्याला तत्काळ होकार दर्शवला. त्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत चेंबूरच्या सायन-ट्रॉम्बे मार्गावरच खास फॅमिली पानशॉप थाटले. या पानांमध्ये कुठल्याही प्रकारची तंबाखू टाकली जात नाही, ही खासियत मोहितने जाणीवपूर्वक जपली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे माकन यांनी संपूर्ण दुकानात तंबाखूमुळे कशाप्रकारे कॅन्सरला सामोरे जावे लागते, याचे पोस्टरदेखील लावले आहेत. ‘कॅन्सरबाबतची जनजागृती करणारा पानवाला’ अशीदेखील आता त्याची नवी ओळख बनली आहे. मुंबईला पानाची टपरी तशी काही नवीन नाही. प्रत्येक हॉटेलच्या बाहेर पानाची टपरी असतेच असते. जेव्हा मुंबईत संघटित गुन्हेगारी फोफावलेली होती, तेव्हा पोलिसांचे टीपर आणि गुन्हेगार हे पानाच्या टपरीच्या आसपास सापडायचे. अनेक पानाच्या टपऱ्या विशिष्ट पानांसाठी ओळखल्यादेखील जातात. मग तो माटुंग्याचा पानवाला असो वा फोर्टमध्ये भररस्त्यात मांड ठोकून बसलेला पानवाला. या पानवाल्यांचे वैशिष्ट्य म्हणजे वकील, पोलीस व कॉर्पोेरेट सेक्टरमधील कर्मचारी पान खाण्यासाठी येतात. त्यामुळे पानाची टपरी आणि मुंबईकर हे नाते तसे जुनेच आहे. पानशॉपच्या व्यवसायातून भरघोस उत्पन्न मिळत नसले तरी पानाच्या टपऱ्या काही बंद झालेल्या नाहीत. काही टपऱ्यांनी कात टाकत नवा साज चढवला. तर काही पानांच्या टपऱ्यांना न्यू लूक मिळाला. मात्र या सर्व पानशॉपला मागे टाकत चेंबूरच्या या तरुणाच्या पानशॉपने एक माईलस्टोन निर्माण केला आहे. विनातंबाखूचे पान उपलब्ध करून देत तंबाखूविरोधी मोहिमेला मोहितने लावलेला हातभार हा अत्यंत मोलाचा आहे. कदाचित त्याचमुळे येथे महिलाही मोकळेपणाने जाऊ शकतात.मोहित माकन यांच्या या अनोख्या व्यवसायातील दुसरी महत्त्वाची बाजू अशी की, एका कुटुंबातील सर्वांनी एकत्रित येऊन, हे शॉप उत्पन्नाचे मुख्य स्रोत बनवले आहे. त्यामुळे अनेक एकत्र कुटुंबांना या व्यवसायातून प्रेरणा मिळू शकते. सर्वसाधारणपणे शहरात प्रत्येकी चार पावलांवर पानाच्या टपऱ्या दिसतात. पानाच्या टपरीवर अनेक टपोरी आणि दारुड्यांचा विळखा हे दृश्य तर नेहमीचेच असते. त्यामुळे अनेक महिला किंवा पानाची आवड असलेल्यांना पानशॉपवर जाता येत नाही. नेमके हेच हेरून चेंबूरच्या सिंधी सोसायटीत राहणाऱ्या मोहित माकन (२७) या तरुणाने फॅमिली पानाची कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा ध्यास घेतला. तीन महिन्यांत चेंबूरच्या सायन-ट्रॉम्बे मार्गावरच त्याने खास फॅमिली पानशॉप थाटले. विशेष म्हणजे पूर्णपणे एअरकंडिशन असलेले मुंबईतील हे पहिलेच पानशॉप आहे. मोहितच्या या पानशॉपमध्ये सध्या चॉकलेट पान, चोको चिप्स, चोको फनस्टास्टिक, व्हेनिला क्रीम, पानशॉर्ट, शाही गुलाम, पान सालसा, नाइट क्वीन, दबंग, पानबहार, चॉकलेट बॉम आणि स्ट्रॉबेरी क्रश असे एकापेक्षा एक दर्जेदार चवीचे ८० हून अधिक पान ग्राहकांना उपलब्ध करून दिले. पानामध्ये लागणारे काही फ्लेवर ते स्वत: बनवतात. तर काही फ्लेवर बाजारातून आणतात. २० रुपयांपासून १५० रुपयांपर्यंत या पानांची किंमत आहे.समीर कर्णुक
चेंबूरचे अनोखे तंबाखूविरहित पानशॉप
By admin | Published: March 28, 2015 11:58 PM