- समीर कर्णुक, मुंबईराज्यात भीषण दुष्काळ असताना आणि मुंबईकरांनाही पाणीटंचाई सोसावी लागलत असताना चेंबूरमध्ये तीन महिन्यांपासून फुटलेल्या पाइपलाइनमधून पाण्याची मोठी नासाडी होत आहे. येथे लाखो लीटर पाणी वाया जात आहे. अनेक तक्रारी दाखल करूनही पालिका अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचे दिसून आहेत. दुष्काळामुळे पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन सर्वच सरकारी यंत्रणांकडून करण्यात येत आहे. मुंबई शहारालाही पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी दिवसेंदिवस कमी होत असल्याने मुंबईमध्येही पाणीकपात केलेली आहे. यापुढेदेखील पाणीकपात वाढण्याचीच शक्यता आहे. त्यामुळे रहिवाशांनीही पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात येत आहे. तथापि, चेंबूरच्या आर.सी. मार्गावरील चेंबूर पोलीस ठाण्याजवळ जानेवारी महिन्यात कंत्राटदाराच्या चुकीमुळे एक पाइपलाइन फुटली होती. या ठिकाणी मुख्य जलवाहिनीला नवीन जलवाहिनी जोडत असताना कंत्राटदाराकडून मुख्य पाइपलाइनला हा खड्डा पडला होता.तेव्हापासून येथून लाखो लीटर पाणी वाया जात आहे. याबाबत काही रहिवाशांनी पालिका अधिकारी आणि कंत्राटदाराशी संपर्क करून पाण्याची नासाडी थांबवण्याची विनंती केली. मात्र कंत्राटदाराने ही फुटलेली पाइपलाइन लपवण्यासाठी त्यावर एक मोठे पत्र्याचे झाकण बसवले. त्यानंतरदेखील रोज २४ तास येथील पाणी वाया जात आहे. आज ही माहिती चेंबूरमधील मनसेच्या वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष नितीन नांदगावकर यांना समजताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पालिकेच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलावून त्यांना ही फुटलेली पाइपलाइन दाखवली. मात्र आम्हाला याबाबत कल्पनाच नसल्याचे या अधिकाऱ्यांनी या वेळी सांगितले. त्यानंतर पाणी विभागाचे सर्व कर्मचारीही या ठिकाणी दाखल झाले. कंत्राटदार, अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करातीन महिन्यांत या ठिकाणी लाखो लीटर पाणी वाया गेले असल्याने कंत्राटदाराकडून या पाण्याचा पूर्ण पैसा वसूल करावा, अशी मागणी नितीन नांदगावकर यांनी केली आहे. शिवाय ज्या अधिकाऱ्यांना याची कल्पना होती, अशा अधिकाऱ्यांवर आणि कंत्राटदारावर गुन्हा दाखल करून पालिकेने त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणीदेखील नांदगावकर यांनी केली आहे.
चेंबूरला पाण्याची ‘धो धो’ नासाडी
By admin | Published: March 29, 2016 2:21 AM