मुंबई : होळी, रंगपंचमीसाठी बाजारात मोठ्या प्रमाणात रासायनिक रंगांची विक्री होते. हे रंग आरोग्यास घातक ठरत असल्याने, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अशा रंग विक्रेत्यांविरुद्ध कारवाईचे आदेश दिले आहेत. शिवाय, वृक्षतोड करणाऱ्यांविरुद्ध मुंबई पोलिसांनी ठोस पावले उचलली आहेत.होळीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक रस्त्याकडेला असलेल्या झाडांबरोबर खासगी आवारातील अनेक झाडे होळीमध्ये जाळण्यासाठी तोडली जातात. त्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचत असल्याने, मुंबई पोलिसांनी वृक्षतोड करू नये, असे आवाहन मुंबईकरांना केले आहे. अशा पद्धतीने कोणी झाडे तोडल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्र (शहर विभाग) झाडे संरक्षण कायदा १९५१ प्रमाणे वृक्ष तोडण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाची पूर्वपरवानगी घेणे गरजेचे आहे. आयुक्तांच्या आदेशानंतर, पोलिसांनी ज्या ठिकाणी अशा स्वरूपाच्या घटना घडल्या आहेत, अशा ठिकाणांवर बंदोबस्त तैनात केला आहे. त्यातही, पूर्व व पश्चिम उपनगरात विशेष गस्त ठेवण्यात आली आहे.त्याचबरोबर मुंबईतील महत्त्वाच्या बाजारांमध्ये रासायनिक रंग विक्रेत्यांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस साध्या गणवेशात गस्त घालत आहेत. त्यामुळे अशा विक्रेत्यांनी वेळीच सावध होणे गरजेचे आहे. तसेच मुंबईकरांनीही अशा रंगांपासून लांब राहावे यासाठी पोलिसांकडून सोसायटी, विविध संस्था तसेच सोशल मीडियाच्या आधारे जनजागृती करण्यात येत आहे.
रासायनिक रंग विक्रेते पोलिसांच्या रडारवर, कठोर कारवाई होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2020 12:22 AM