चेंबूरमध्ये रासायनिक कंपन्यांमुळे प्रदूषणात भर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2018 05:18 AM2018-08-09T05:18:13+5:302018-08-09T05:18:26+5:30

उपनगरातील चेंबूर, मानखुर्द, गोवंडीसह कुर्ला येथील काही परिसर पूर्वीपासूनच प्रदूषित आहे.

Chemical companies in Chembur fill the pollution | चेंबूरमध्ये रासायनिक कंपन्यांमुळे प्रदूषणात भर

चेंबूरमध्ये रासायनिक कंपन्यांमुळे प्रदूषणात भर

googlenewsNext

मुंबई : उपनगरातील चेंबूर, मानखुर्द, गोवंडीसह कुर्ला येथील काही परिसर पूर्वीपासूनच प्रदूषित आहे. मुळात येथील तेल कंपन्यांसह रासायनिक कंपन्यांमुळे प्रदूषणात भर पडल्याचा आरोप पर्यावरणतज्ज्ञांसह स्थानिकांनी कित्येकवेळा केला असतानाच बुधवारी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल)मधल्या रिफायनरी हायड्रोजन क्रॅकर प्लाँटमध्ये झालेल्या स्फोटामुळे येथील वातावरणात भरच पडली आहे.
मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख प्रभात रहांगदळे यांनी यासंदर्भात अधिक माहिती देताना सांगितले, रिफायनरी हायड्रोजन क्रॅकर प्लाँटमध्ये लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी ७२ टन हायड्रोकार्बनचा वापर करण्यात आला. घटनास्थळावर उशिरापर्यंत कूलिंग आॅपरेशन सुरू होते. सुरक्षेच्या कारणात्सव सर्व प्लाँट बंद करण्यात आले. येथील आग पुन्हा भडकणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली असून, घटनास्थळावरील परिस्थिती नियंत्रणात आहे.
स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, दुर्घटनास्थळावरील स्फोटाची तीव्रता एवढी होती की, त्यामुळे माहुल गावासह लगतचा परिसर हादरला. मुळात येथील प्रदूषण किंवा आगीच्या घटना स्थानिकांना नव्या नाहीत. येथील दुर्घटनांचे सत्र सुरूच असते; आणि प्रदूषणाचा सामना रहिवाशांना रोजच करावा लागतो. पर्यावरण विषयाचे अभ्यासक आणि येथील समस्येवर आवाज उठवलेले अ‍ॅड. गॉडफ्रे पिमेंटा यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले, येथील परिसर हा यापूर्वीच्या विकास आराखड्यात ‘हेव्ही इंडस्ट्रीयल झोन’साठी घोषित करण्यात आला होता. परिणामी, येथे दाटीने वस्ती होणे अपेक्षित नव्हते. मात्र मागील तीसएक वर्षांचा विचार करता येथील लोकवस्ती आणि लोकसंख्या वाढत गेली. महत्त्वाचे म्हणजे माहुलसारख्या ठिकाणी महापालिकेने प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन केले. आजघडीला त्यांना अशा अनेक घटनांना सामोरे जावे लागते आहे.
चेंबूर येथील आगीच्या दुर्घटनेवेळी स्थानिक लोकप्रतिनिधींनी येथील लोकांना सुरक्षितस्थळी हलवित त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. शिवाय दुर्घटनास्थळावर आत अडकलेल्या कर्मचारी वर्गास बाहेर काढण्यासाठी मदत केली. येथे आपत्कालीन सेवांशी संबंधित वाहने वेगाने घटनास्थळावर वेळेत दाखल होतील; यासाठी तरुण कार्यकर्त्यांनी येथील वाहतूक मोकळी केली असली तरी स्फोटाने चेंबूर, माहुलसह सायन लगतचा परिसर हादरल्याचे स्थानिकांचे म्हणणे असून, सहा तासांनंतरही आग विझली नसल्याने येथील भीतीदायक वातावरण कायम आहे.
>भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच बीपीसीएल कंपनी ही भारत सरकारच्या अधिपत्याखाली काम करते. मुंबईत बीपीसीएलचे मुख्यालय आहे. बीपीसीएल कंपनी ही तेल आणि गॅसनिर्मिती करणारी कंपनी आहे. बीपीसीएलच्या मुंबई आणि कोचीनमध्ये सर्वांत मोठ्या रिफायनरी आहेत. सध्या बीपीसीएलचे डी. राजकुमार हे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत.
२४ जानेवारी १९७६ला भारत सरकारने बर्मा शेल ग्रुप आॅफ कंपनीला आपल्या अधिपत्याखाली आणले आणि भारत रिफायनरीज लिमिटेड अशी कंपनी स्थापन केली. त्यानंतर १ आॅगस्ट १९७७ला या कंपनीचे ‘भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड’ असे नामकरण करण्यात आले. जगातील ५०० मोठ्या कंपन्यांच्या यादीत २०१६ साली फॉर्च्युन मासिकाने बीपीसीएलला ३५८वे स्थान दिले होते.भारतात बीपीसीएलच्या चार मोठ्या रिफायनरीज आहेत. वार्षिक १३ मेट्रिक मिलियन टन क्षमता असलेली मुंबई रिफायनरी, वार्षिक १५ मेट्रिक मिलियन टन क्षमता असलेली केरळमधील कोचीनची रिफायनरी, वार्षिक ६ मेट्रिक मिलियन टन क्षमता असलेली मध्य प्रदेशमधली बिना येथील रिफायनरी आणि वार्षिक ३ मेट्रिक मिलियन टन क्षमता असलेली आसाममधील नुमालिगढ येथील रिफायनरी अशा बीपीसीएलच्या ४ रिफायनरीज आहेत.
पेट्रोलियम आणि पेट्रोलियम उत्पादनांचे संशोधन, निर्मिती आणि विक्री अशी बीपीसीएलच्या कामाची व्याप्ती आहे. पेट्रोलियम क्षेत्रातील बीपीसीएलचे नेटवर्क सर्वांत भक्कम आणि मोठे मानण्यात येते.

Web Title: Chemical companies in Chembur fill the pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.