केमिकल टँकर पलटला
By admin | Published: May 25, 2014 03:30 AM2014-05-25T03:30:46+5:302014-05-25T03:30:46+5:30
सायन - पनवेल महामार्गावर सानपाडा येथे रात्री ११ वाजता केमिकल टँकर पलटी झाला. टँकरमधील हजारो लिटर केमिकल रस्त्यावर पसरल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
नवी मुंबई : सायन - पनवेल महामार्गावर सानपाडा येथे रात्री ११ वाजता केमिकल टँकर पलटी झाला. टँकरमधील हजारो लिटर केमिकल रस्त्यावर पसरल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अपघातामुळे महामार्गावर मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. महामार्गावरून केमिकल भरलेला टँकर (एमएच ०५ के ९०१६) मुंबईकडे जात होता. ११ वाजण्याच्या सुमारास सानपाडाजवळ नवीन उड्डाणपुलाजवळ चालकाचा ताबा सुटला. टँकर संरक्षण कठड्याला धडकून पलटी झाला. चालक व वाहकांना किरकोळ दुखापत झाली आहे. पलटी झालेल्या टँकरचे झाकण खुले झाल्यामुळे मोठ्याप्रमाणात केमिकल रस्त्यावर पसरले. रॉकेलप्रमाणे वास येणारे केमिकल नक्की काय होते हे उशिरापर्यंत समजले नाही. अपघातामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पुण्याकडे जाणार्या मार्गिकेवर मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. वाहतूक पोलिस व तुर्भे पोलिस स्टेशनच्या कर्मचार्यांनी तत्काळ घटनास्थळी येवून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले.