रासायनिक सांडपाणी नवापूर समुद्रात
By admin | Published: December 3, 2014 11:59 PM2014-12-03T23:59:28+5:302014-12-03T23:59:28+5:30
तारापूर एमआयडीसीमधील जुन्या व नव्याने उभारण्यात येणाऱ्या अशा दोन्ही सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रांत प्रक्रिया केलेले रासायनिक सांडपाणी नवापूरच्या
बोईसर : तारापूर एमआयडीसीमधील जुन्या व नव्याने उभारण्यात येणाऱ्या अशा दोन्ही सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रांत प्रक्रिया केलेले रासायनिक सांडपाणी नवापूरच्या खोल समुद्रात सोडण्याची महत्त्वाकांक्षी योजना एमआयडीसीने तयार केली आहे. ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर समुद्रकिनाऱ्यावरील प्रदूषण नियंत्रणात येणार असून या योजनेकरिता सुुमारे ११३ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून सध्या या योजनेचे टेंडर प्रोसेसमध्ये आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रात प्रामुख्याने रासायनिक प्रक्रिया करणारे उद्योग कार्यरत असून मोठ्या प्रमाणावर सांडपाण्याची निर्मिती होऊन विविध कारखान्यांतून निर्माण झालेले सांडपाणी एकत्रित करून त्यापैकी सुमारे २५ एमएलडी पाण्यावर औद्योगिक क्षेत्रातील सीईटीपीमध्ये प्रक्रिया करून प्रक्रिया केलेले व अतिरिक्त पाण्यावर प्रक्रिया न करताच सुमारे ५० एमएलडी सांडपाणी नवापूर गावाजवळील अरबी समुद्रामध्ये पूर्वी सीपीडब्ल्यूआरएस, पुणे यांनी निश्चित केलेल्या विसर्जन बिंदूच्या ठिकाणी म्हणजेच समुद्रकिनाऱ्यापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर सोडण्यात येते. त्यामुळे नवापूरसह दांडी, उच्छेळी, आलेवाडी, नांदगाव, मुरबे, सातपाटी इ. समुद्रकिनाऱ्यांवर घातक सांडपाण्यामुळे प्रदूषण होऊन मासे मेल्याच्या घटना नेहमीच घडत असून आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे.
खाडीकिनाऱ्यावरील प्रदूषित सांडपाण्यामुळे मच्छीमारांच्या संतप्त भावना लक्षात घेऊन एमआयडीसीने याबाबतीत राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेकडून अभ्यास करून नव्याने सांडपाणी विसर्जनाचे ठिकाण निश्चित केले. त्याप्रमाणे ते सांडपाणी नवापूर किनाऱ्यापासून ७.१० किमी अंतरावर सोडण्यात येणार आहे. त्यासाठी १००० मिमी व्यासाची हाय डेन्सिटी पॉली इथेलीन (एचडीपीई) अशी अद्ययावत पाइपलाइन समुद्रतळाखाली २.५० मीटर खालून टाकण्यात येणार आहे. या वाहिनीच्या शेवटी डिफ्युजर बसविण्यात येणार आहे. त्यामुळे समुद्रात सोडण्यात येणारे सांडपाणी जास्त जागेत विखुरले जाणार आहे, तर सांडपाणी विसर्जन ठिकाणी नेहमीच १२ मी.पेक्षा जास्त समुद्राचे पाणी असल्याने सोडण्यात येणारे सांडपाणी समुद्राच्या जास्त पाण्यात मिसळणार आहे. त्यामुळे सागरी पर्यावरणावर परिणाम होणार नसल्याची अपेक्षा वर्तविली जात आहे. (वार्ताहर)