धक्कादायक! केमिस्टनं उलटीच्या औषधाच्या बदल्यात दिली रक्तदाबाची गोळी, वांद्रे परिसरातील घटना
By गौरी टेंबकर | Published: November 6, 2022 08:02 AM2022-11-06T08:02:14+5:302022-11-06T08:02:41+5:30
उलटी आणि पोटदुखीचा त्रास होणाऱ्या अकरा वर्षीय मुलाला रक्तदाबाची गोळी दिल्याचा प्रकार वांद्रे परिसरात घडला.
मुंबई :
उलटी आणि पोटदुखीचा त्रास होणाऱ्या अकरा वर्षीय मुलाला रक्तदाबाची गोळी दिल्याचा प्रकार वांद्रे परिसरात घडला. चुकीच्या औषधामुळे या मुलाचा रक्तदाब कमी झाला. याप्रकरणी निर्मलनगर पोलिसांकडून केमिस्टची चौकशी केली जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
निर्मलनगर परिसरात राहणाऱ्या नैतिक शुक्ला (११) या मुलाचे वडील धीरज रिक्षाचालक आहेत. नैतिकला उलटी आणि पोटदुखीचा त्रास होत होता. त्यामुळे वडिलांनी त्यांच्याकडे असलेली उलटी थांबण्याच्या गोळीची संपलेली स्ट्रिप जवळच्या केमिस्टकडे नेली व औषध आणले. त्या गोळ्या नैतिकला दिल्या. मात्र, त्या गोळ्या घेतल्यानंतर त्याची प्रकृती अधिकच ढासळली. त्यामुळे घाबरलेल्या कुटुंबीयांनी त्याला जवळच्या ओम बालाजी मेडिकल सेंटर येथे नेले. तिथे डॉ. कौशलकुमार सिंग यांनी त्याला तपासले तेव्हा त्याचा रक्तदाब ८०/६० इतका कमी झाला होता.
तेव्हा कोणते औषध दिले? अशी विचारणा डॉ. सिंग यांनी शुक्ला कुटुंबीयांना केली आणि त्यांनी गोळीची स्ट्रिप त्यांना दाखवली. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, नैतिकने घेतलेली उलटी थांबण्याची नसून उच्च रक्तदाब नियंत्रित करणारी होती. त्यामुळे त्याचा रक्तदाब कमी झाला. डॉ. सिंग यांनी नैतिकला तातडीने व. न. देसाई या पालिका रुग्णालयात हलविण्यास सांगितले.
तिथून त्याला सायन रुग्णालयात पाठवल्यानंतर डॉक्टरच्या सल्ल्याने वांद्रे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे त्याच्यावर उपचार करण्यात आले असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे.