Join us

सर्व जिल्हा रुग्णालयांत केमोथेरपी सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2020 5:26 AM

केमोथेरपीच्या सुविधेचा विस्तार राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांत करण्यात येईल, अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येथे केली.

मुंबई : केमोथेरपीच्या सुविधेचा विस्तार राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांत करण्यात येईल, अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येथे केली. मंत्रालयात विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर विभागाचा आढावा बैठक घेऊन त्यांनी ही सुविधा राज्यभर सुरू करण्याचा निर्णय घेतला. या वेळी आरोग्य सेवेचा समग्र आढावा आरोग्यमंत्र्यांनी घेतला.राज्यात सध्या ११ जिल्हा रुग्णालयांमध्ये केमोथेरपीची सुविधा उपलब्ध असून कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेता रुग्णांना दिलासा देण्याकरिता सर्वच जिल्हा रुग्णालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी टाटा रुग्णालयाच्या सहकार्याने आवश्यक त्या तांत्रिक बाबी पूर्ण करण्याच्या सूचना विभागाला या वेळी देण्यात आल्या. आरोग्य संस्थांचे जाळे राज्यभर पसरले असून त्यांचे बळकटीकरण, स्वच्छता, डॉक्टरांची उपलब्धता या बाबींवर भर देण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री यांनी सांगितले.डॉक्टरांची रिक्त पदे भरताना ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये औषधांचा साठा मुबलक राहील याची दक्षता आरोग्य यंत्रणेने घ्यावी, असे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी या वेळी दिले.बैठकीत विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सादरीकरण केले. या वेळी आरोग्य आयुक्त अनुपकुमार यादव, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे सुधाकर शिंदे, राज्य कामगार विमा रुग्णालयाचे आयुक्त आप्पासाहेब धुळज, आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे आदी उपस्थित होते.