Join us

चेन्नई-शिर्डी विमान मुंबईला वळविले; एटीसी मुंबईला संपर्क साधत लँडिंगची मागितली परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 11:08 PM

स्पाईस जेटचे एसजी-५४७ हे नियोजित विमान बुधवारी दुपारी २.१५ वाजता चेन्नईहून शिर्डीच्या दिशेने रवाना झाले.

मुंबई : चेन्नईहून शिर्डीला येणारे स्पाईस जेटचे विमान बुधवारी मुंबईला वळविण्यात आले. कमी दृश्यमानतेमुळे लँडिंगमध्ये अडथळे येत असल्याने हा निर्णय घेण्यात आला.

स्पाईस जेटचे एसजी-५४७ हे नियोजित विमान बुधवारी दुपारी २.१५ वाजता चेन्नईहून शिर्डीच्या दिशेने रवाना झाले. ते ४ वाजता शिर्डी विमानतळावर उतरणे अपेक्षित होते. परंतु, दृश्यमानता कमी असल्याने लँडिंग करण्यात अडथळे येऊ लागले. त्यामुळे जवळपास सात घिरट्या घालून वातावरण स्थिर होण्याची वाट पाहण्यात आली. परंतु, लँडिंग करण्याजोगी स्थिती नसल्याने वैमानिकांनी एटीसी मुंबईला संपर्क साधत लँडिंगची परवानगी मागितली.

परवानगी मिळताच विमान मुंबईला वळविण्यात आले. सायंकाळी ५ वाजता ते मुंबईच्या धावपट्टीवर उतरले. मात्र, यात विमानातील १२६ प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. शिर्डी एटीसीकडून परवानगी मिळाल्यास रात्री ते शिर्डीच्या दिशेने प्रयाण करेल. दरम्यान, हे विमान सायंकाळी ४.३० वाजता शिर्डीहून चेन्नईसाठी नियोजित होते. परंतु ही फेरी रद्द करावी लागली.

टॅग्स :विमाननाशिकमुंबई