चेक बाऊन्सचा खटला आरोपीच्या गैरहजेरीत चालवता येतो, मुंबई उच्च न्यायालयाने केले स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 06:04 IST2025-01-25T06:03:16+5:302025-01-25T06:04:53+5:30

Mumbai News: निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्टच्या (एनआय कायदा) कलम १३८ चा खटला आरोपीच्या अनुपस्थितीत चालविता येतो आणि आरोपीचा जबाब न नोंदवता पूर्ण करता येतो, असे मुंबई हायकोर्टाने म्हटले आहे.

Cheque bounce case can be tried in the absence of the accused, Bombay High Court clarifies | चेक बाऊन्सचा खटला आरोपीच्या गैरहजेरीत चालवता येतो, मुंबई उच्च न्यायालयाने केले स्पष्ट

चेक बाऊन्सचा खटला आरोपीच्या गैरहजेरीत चालवता येतो, मुंबई उच्च न्यायालयाने केले स्पष्ट

- डॉ. खुशालचंद बाहेती  
मुंबई - निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्टच्या (एनआय कायदा) कलम १३८ चा खटला आरोपीच्या अनुपस्थितीत चालविता येतो आणि आरोपीचा जबाब न नोंदवता पूर्ण करता येतो, असे मुंबई हायकोर्टाने म्हटले आहे.

मुंबईत सुषमा चांडक यांनी नवनीतसिंग यांना एक कोटी रुपये हातउसने दिले होते. २९ ऑक्टोबर २०१५ चे ५० लाखांचे दोन चेक नवनीतसिंग यांनी सुषमा यांना दिले. बॅंकेत चेक वटले नाहीत. सुषमा यांनी १३८ एनआय कायद्यान्वये दोन गुन्हे दाखल केले. यात नवनीतसिंग, त्यांची पत्नी व त्यांच्या कंपनीला आरोपी करण्यात आले होते. 

सुरुवातीला आरोपींनी कोर्टात हजर राहून जामीन घेतला. मात्र, नंतर ते गैरहजर राहिले. आरोपीचे वकीलही गैरहजर राहिले. आरोपींनी वैयक्तिक हजेरीतूनही न्यायालयाकडून सूट मिळवली नव्हती. एकदा तर जामीनपात्र वॉरंटही काढण्यात आले. नंतर मात्र दंडाधिकाऱ्यांनी आरोपींच्या अनुपस्थितीत पूर्ण खटला चालवला आणि त्यांना प्रत्येक प्रकरणात एक वर्ष तुरुंगवास आणि एक कोटी दंडाची शिक्षा सुनावली. नऊ टक्के व्याजासह चेकची रक्कम देण्याचे आदेशही दिले.

नवनीतसिंग आणि इतरांनी हायकोर्टात अपील केले. तक्रारदाराने त्यांच्या उपस्थितीसाठी प्रयत्न केले नाहीत. अनुपस्थितीत खटला चालवणे नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाच्या विरुद्ध आहे, असा युक्तिवाद करण्यात आला. न्यायमूर्ती एस. एम. मोडक म्हणाले की, १३८ एनआय कायदा ‘अर्ध-गुन्हेगारी स्वरूपाचा’ आहे. त्यामुळे दंडाधिकारी कलम १३८ एनआय कायद्यांतर्गत आरोपीच्या उपस्थितीशिवाय  खटला चालवू शकतात.  

९ टक्के खटले एनआय कायद्याचे 
न्यायालयात प्रलंबित खटल्यांपैकी सुमारे ९ टक्के १३८ एनआय कायद्याचे आहेत. यात आरोपी हजर नसल्याने खटले प्रलंबित राहण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. या निर्णयाचा परिणाम अशा खटल्यांवर होईल. 

Web Title: Cheque bounce case can be tried in the absence of the accused, Bombay High Court clarifies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.