Join us

अंधेरीतल्या चेशायर होमचा सौरऊर्जा प्रकल्प ठरतो आधारवड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2018 12:00 PM

विकलांग व्यक्तींची काळजी घेणे शक्य नसणाऱ्यांसाठी 1955 साली स्थापन झालेल्या अंधेरी पूर्व महाकाली गुंफा रोडवरील कनोसा शाळेजवळील  चेशायर होमचा सौरऊर्जा प्रकल्प आधारवड ठरत आहे.

मनोहर कुंभेजकरमुंबई - विकलांग व्यक्तींची काळजी घेणे शक्य नसणाऱ्यांसाठी 1955 साली स्थापन झालेल्या अंधेरी पूर्व महाकाली गुंफा रोडवरील कनोसा शाळेजवळील  चेशायर होमचा सौरऊर्जा प्रकल्प आधारवड ठरत आहे. येथील चेशायर होम मध्ये असलेला सुमारे 30 किव्हॅटचा येथील सौरऊर्जा प्रकल्प येथील दोन कौलारू छपरांवर कार्यान्वित करण्यात आला असून येथील दोन्ही छपरांवर मिळून 115 सौरऊर्जा पॅनल बसवण्यात आले आहेत. याद्वारे निर्माण होणाऱ्या सौर ऊर्जेचा येथे वापर विद्युत उपकरणांसाठी गेल्या एप्रिल पासून करण्यात येत असल्यामुळे भविष्यात येथे सुमारे 80 टक्के वीजेची दरमहा सुमारे 50000 रुपयांची मोठी बचत होणार आहे. या प्रकल्पाचे उदघाटन येत्या शनिवार दि,30 रोजी दुपारी 4.30 वाजता ऑस्ट्रेलियन दूतावास टोनी हुबेर यांच्या हस्ते येथील संकुलात होणार असल्याची माहिती येथील चेशायर होमचे संचालक शैलेश जैन यांनी दिली. येथे विकलांग व्यक्तींसाठी निवासी व्यवस्था असून त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी सुसज्ज वर्कशॉप देखील आहे.

गेल्या 15 वर्षांपासून अपंगांसाठी शहरी समुदाय अंतर्गत पुनर्वसन सेवा केंद्र कार्यान्वित आहे.यामाध्यमातून येथे विकलांग व्यक्तिना विशेष शिक्षण, समावेशक शिक्षण,फिजिओथेरपी, सामुदायिक सामुग्री वस्तू उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली आहे.तसेच त्यांच्या सुधारात्मिक शस्त्र क्रियांच्या खर्चासाठी अर्थसहाय्य देण्यात येते.तसेच त्यांच्या हक्कासाठी प्रचार करण्याचे काम चेशायर होम करते.अंधेरीतील चेशायर होम ही मुंबईतील पहिली संस्था असून भारतात एकूण 22 चेशायर होम आहेत.लियोनाल्ड चेशायर डीसाबिलिटी ग्लोबल अलायन्स अंतर्गत जगातील 52 देशात 250 चेशायर होम आहेत.

येथे प्रौढ निवासी -18, डे केयर मध्ये 50 मानसिक विकलांग मुलं-मुली,  फिसिओथेरेपी करीता 20-25 अस्थिव्यंग आणि सेरेब्रल पाल्सीग्रस्त मूल मूली अशी माहिती मुंबई चेशायर होमचे अध्यक्ष पी.एम.जॉन यांनी दिली. या कामासाठी ऑस्ट्रेलियन एड डायरेक्ट ऐड प्रोग्राम(DAP) अंतर्गत ऑस्ट्रेलियन दूतावास, मुंबई यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. जगातील 250 चेशायर होम मानवतेचे कार्य विकलांगांसाठी करत आहे असे जॉन यांनी अभिमानाने सांगितले.

या सौर उर्जेव्यतिरिक्त गेली सुमारे दीड वर्षे अनेक पर्यावरण प्रकल्प येथे राबवले जात आहेत यामध्ये येथे जमा होणारा पाला पाचोळा व ओल्या आणि सुक्या कचऱ्यापासून गांडूळ खत तयार होत आहे. या खताचा वापर येथील परिसरात करण्यात येत असून केळी, पपई, आंबे आणि अन्य फळे व ताज्या भाज्यांची लागवड येथे करण्यात येत असल्याची माहिती येथील व्यवस्थापक संजय मुंगी यांनी  दिली.गेल्या शनिवारपासून राज्य शासनाने लागू केलेल्या प्लास्टिक बंदीची येथे यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात येत असून येथे विकलांग मुलांच्या पालकांनी येथील टेलरिंग विभागात तयार केलेल्या आकर्षक कापडी पिशव्या तयार केल्या असून या पिशव्यांना येथील गृहनिर्माण सोसायट्यांमधून चांगली मागणी असल्याची माहिती संजय मुंगी यांनी दिली.