मुंबई : शालेय विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिबळाच्या आवड निर्माण व्हावी, बुद्धिबळाचा विकास व्हावा म्हणून बुद्धिबळ आयोजनाची आगळीवेगळी चळवळ सुरू करणारे बुद्धिबळ संघटक आणि मुंबई क्रिकेट संघटनेचे सुवर्णपदक विजेते क्रिकेट पंच डॉ. प्रकाश वझे यांचे ठाणे येथे ट्रक अपघातात निधन झाले. ते 67 वर्षांचे होते.ठाण्यातील आनंदनगर चेक नाका परिसरात झालेल्या अपघातात ट्रकने दिलेल्या धडकीत वझे यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्यासोबत असलेला त्यांचा सहाय्यक नागप्पा हेडगे गंभीर जखमी झाला. रस्त्यावर असलेला खड्डा चुकवताना डॉक्टर वझे यांना मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. हेडगे याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
डॉ. वझे यांना क्रिकेटची प्रचंड आवड असली तरी गेली 20 वर्षे शालेय विद्याथ्यांसाठी बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन करणे ही त्यांची प्राथमिकता झाली हाती. त्यांनी वर्षाला सहा विविध बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन करून बुद्धिबळ चळवळ सुरू केली होती. त्यांच्या स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी खेळायचे. महाराष्ट्रात सर्वाधिक बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करणारे आयोजक म्हणून वझे यांचे नाव सर्वात वर होते. तसेच सुवर्णपदक विजेते असलेल्या वझे यांनी मुंबई क्रिकेट संघटनेच्या अनेक प्रथम श्रेणी सामन्यामध्ये अंपायर म्हणूनही काम पहिले होते. अपायरिंग करत असतांना त्यांनी अनेक वर्षे नवोदितांसाठी मोफत क्रिकेट अंपायर प्रशिक्षण शिबीरे आयोजित केली होती. स्वताच्या नावाने स्थापन केलेल्या डॉक्टर प्रकाश वझे क्रीडा प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी वैद्यकीय व्यावसायिकांसाठी टेनिस, डबल विकेट क्रिकेट, बॅडमिंटनच्या राज्यस्तरीय स्पर्धांही आयोजित केल्या. याशिवाय स्थानिक पातळीपासून फिडे रेटिंग बुध्दिबळ स्पर्धा आयोजित करून डॉक्टर वझे यांनी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील उदयोन्मुख बुध्दिबळपटूना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते. त्यांच्या अपघाती निधनाने बुद्धिबळ क्षेत्राने एक धडपड्या आयोजक गमावला असल्याची प्रतिक्रिया बुद्धिबळ संघटक पुरुषोत्तम भिलारे यांनी व्यक्त केली.