"विधू विनोद चोप्रांमुळे माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली होती"
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 11:33 PM2020-07-21T23:33:36+5:302020-07-21T23:34:10+5:30
लेखक चेतन भगत यांचे दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांच्यावर अतिशय गंभीर आरोप
मुंबई: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) आत्महत्या प्रकरणावर भाष्य करत असताना प्रसिद्ध लेखक चेतन भगत (Chetan Bhagat) यांनी निर्माते, दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा (Vidhu Vinod Chopra) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. चोप्रा यांनी जाहीरपणे माझा अपमान केला. त्यांच्यामुळे आपल्या आत्महत्या करण्याची वेळ आली होती, असा अतिशय गंभीर आरोप भगत यांनी केला आहे.
विधू विनोद चोप्रा यांच्या पत्नी आणि समीक्षक अनुपमा चोप्रा यांच्या ट्विटला चेतन भगत यांनी उत्तर दिलं आहे. अनुपमा यांनी सुशांत सिंह राजपूतबद्दल चेतन भगत यांनी केलेल्या ट्विटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. त्याला उत्तर देताना भगत यांनी आपली व्यथा मांडली. भगत यांनी लागोपाठ अनेक ट्विट्स केली आहेत. 'सुशांत सिंह राजपूतच्या दिल बेचारा चित्रपटाबद्दल समीक्षकांनी समजतूदारपणे लिहावं. त्यांनी ओव्हरस्मार्ट होऊन लिखाण करू नये. त्यांनी निष्पक्ष आणि समजूतदार व्हावं,' असं भगत यांनी म्हटलं.
चेतन भगत यांच्या ट्विटला अनुपमा चोप्रा यांनी उत्तर दिलं. 'समजूतदारपणाचा स्तर यापेक्षा खाली जाणार नाही, असा विचार काही जण करतात. मात्र तरीही दुर्दैवानं तो स्तर घसरतो,' असं अनुपमा यांनी म्हटलं. याला प्रत्युत्तर देताना भगत यांनी अनुपमा यांचे पती विधू विनोद चोप्रा यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले. 'विधू विनोद चोप्रा यांनी कोणतीही शरम न बाळगता कथेशी संबंधित सर्व पुरस्कार स्वत: घेतले. त्यांनी जाहीरपणे माझा अपमान केला. त्यांनी मला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं,' असा गंभीर आरोप भगत यांनी केला आहे.
सुशांत सिंह राजपूतच्या 'दिल बेचारा'बद्दल काय म्हणाले होते चेतन भगत?
सुशांत सिंह राजपूतचा अखेरचा चित्रपट ठरलेल्या दिल बेचाराचं समीक्षण समजुतदारपणे लिहावं, असं चेतन भगत यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. 'सुशांत सिंग राजपूतचा अखेरचा चित्रपट याच आठवड्यात प्रदर्शित होईल. त्यावर सर्व कुलीन समीक्षकांनी समजुतदारपणे लिहावं, असं मी आवाहन करतो. त्यांनी ओव्हरस्मार्ट होऊन काम करू नये. वाईट गोष्टी लिहू नयेत. तुम्ही तशीही अनेक आयुष्यं उद्ध्वस्त केली आहेत. आता थांबा. आम्ही लोक पाहत आहोत,' असं भगत यांनी ट्विटमध्ये लिहिलं होतं.