मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करणाऱ्या पुस्तकाचा भुजबळांकडून खरपूस समाचार, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 10:54 AM2020-01-13T10:54:01+5:302020-01-13T11:06:46+5:30
छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणाऱ्या 'आज के शिवाजी' या पुस्तकावर बंदी घातली पाहिजे.
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणाऱ्या 'आज के शिवाजी' या पुस्तकाविरोधात विविध स्तरांवरून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही छत्रपती शिवाजी महाराज आणि मोदींची तुलना करणाऱ्या या पुस्तकाचा खरपूस समाचार घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात तुलना होऊच शकत नाही, असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला आहे.
'आज के शिवाजी' या पुस्तकावर जोरदार टीका करताना छगन भुजबळ म्हणाले की, ''छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना सोबत घेऊन राज्य केले होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि हे कुठे, छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात तुलना होऊच शकत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या तुलनेमुळे शिवरायांवर प्रेम करणाऱ्या शिवप्रेमींना राग येणे साहजिकच आहे. अशा प्रकारची तुलना करणाऱ्या 'आज के शिवाजी' या पुस्तकावर बंदी घातली पाहिजे.''
मोदी आणि शिवरायांची तुलना राज्यातल्या भाजपा नेत्यांना मान्य आहे का?; शिवसेनेचा सवाल
मोदींची तुलना शिवरायांशी, भाजपच्या पुस्तकावर संताप; शिवप्रेमींकडून टीकेची झोड
'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तकावरुन छत्रपती संभाजीराजे संतप्त; म्हणाले...
शाब्बास भाजपा; 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी'वरुन शिवसेनेचा खोचक टोला
दरम्यान, 'आज के शिवाजी' या वादग्रस्त पुस्तकावरुन भाजपाला धारेवर धरणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजही भाजपाला लक्ष्य केलs. छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना राज्यातल्या भाजपा नेत्यांना मान्य आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सर्व मुद्द्यांवर लगेच भूमिका मांडणारे भाजपा नेते शिवराय आणि मोदींच्या तुलनेवर संध्याकाळपर्यंत स्वत:ची भूमिका मांडतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजचे शिवाजी महाराज आहेत, असा आशय असलेल्या 'आज के शिवाजी' या पुस्तकाचे रविवारी दिल्ली येथील भाजपा कार्यालयात प्रकाशन करण्यात आले होते. त्यामुळे वादाला तोंड फुटले आहे. तसेच या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे.