Sharad Pawar Birthday: “शरद पवारांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात जो चमत्कार झाला, तोच २०२४ मध्ये दिल्लीत होईल”: छगन भुजबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2021 07:23 PM2021-12-12T19:23:11+5:302021-12-12T19:24:52+5:30
Sharad Pawar Birthday: साहित्य, शिक्षण, विज्ञान, कला, क्रीडा यांसह विविध क्षेत्रात शरद पवारांचे मोलाचे योगदान आहे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात अनेक नेत्यांनी उपस्थिती लावली. राष्ट्रवादीचे खासदार, आमदार, मंत्री, कार्यकर्ते यांनी यावेळी शरद पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. शरद पवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात जो चमत्कार झाला, तोच २०२४ मध्ये दिल्लीत होईल, असा दावा छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केला.
संपूर्ण देशभरात सर्वांना सोबत घेऊन जाण्याची ताकद राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यात आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात जो महाविकास आघाडी सरकारचा चमत्कार झाला. तसाच चमत्कार २०२४ मध्ये दिल्लीत होईल. त्यासाठी पवारांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, असे छगन भुजबळ म्हणाले.
विविध महत्त्वाच्या क्षेत्रात शरद पवारांचे मोलाचे योगदान
देशात साहित्य, शिक्षण, विज्ञान, कला, क्रीडा यांसह विविध महत्त्वाच्या क्षेत्रात शरद पवारांचे मोलाचे योगदान आहे. क्रीडा क्षेत्रात त्यांनी केलेले काम जगभरात गाजले असून कुस्तीला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचविण्याचे कामही त्यांनी केले. कृषी क्षेत्रात त्यांनी दिलेल्या विशेष योगदानामुळे देश अन्न, धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला असून, फळबाग लागवड क्षेत्रातही अग्रभागी आहे. त्यांच्या या विशेष योगदानामुळे जगभरात अन्न, धान्याची फळांची निर्यात आपण करू शकत असल्याचे छगन भुजबळ सांगितले.
शरद पवारांचा संयम कधीही ढळणार नाही
अनेक संकटांना शरद पवारांनी तोंड दिले आहे. किती जरी मोठे संकट त्यांच्यासमोर आले तरीदेखील शरद पवारांचा संयम कधीही ढळणार नाही, ही अतिशय विशेष बाब आहे. देशभरात जो ओबीसींचा प्रश्न गाजत आहे. त्या ओबीसी समाजाला सर्व प्रथम महाराष्ट्रात आरक्षण देण्याचे काम त्यांच्या नेतृत्वाखाली झाले. राज्यात मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासोबत अनेक क्रांतीकारी निर्णय त्यांनी घेतले. त्यामुळे महाराष्ट्र एका उंचीवर पोहोचला, असे छगन भुजबळ यांनी नमूद केले.