“शरद पवार आमचे गुरु, विचारधारा आम्ही गुरुकडून शिकलो आहोत”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 11:28 AM2023-07-05T11:28:12+5:302023-07-05T11:29:20+5:30
Sharad Pawar Vs Ajit Pawar: गुरुपौर्णिमेच्या दिवशी आम्ही सत्तेत गेलो. हीच आमची शरद पवारांना गुरुदक्षिणा आहे, असे छगन भुजबळ म्हणाले.
Sharad Pawar Vs Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर कुणाकडे किती आमदार, याबाबत सस्पेन्स कायम आहे. शरद पवार आणि अजित पवार गटांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. जास्तीत जास्त आमदार, पदाधिकारी आपल्याकडे असल्याचा दावा अजित पवार गट करत आहे. तर आपल्याकडेच जास्त संख्याबळ असल्याचा दावा शरद पवार गटाकडून करण्यात येत आहे. यातच अजित पवारांसोबत जात मंत्रिपदाची शपथ घेतलेले छगन भुजबळ यांनीही बहुतांश आमदार अजित पवारांसोबत असल्याचा दावा केला आहे.
दोन ते तीन आमदार सोडल्यास अन्य सर्व आमदारांनी प्रतिज्ञापत्रावर सह्या करून दिलेल्या आहेत. सर्व आमदार आमच्यासोबत आहेत. शरद पवार यांनी फोन केला, तर काही आमदार तिथे जाऊन त्यांची भेट घेतात, हे खरे आहे. मात्र, असे असले तरी ते नंतर अजित पवारांसोबत येतात, असा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे. आम्हाला फोन आला तर आम्हीही भेटायला जाऊ, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. मीडियाशी बोलताना छगन भुजबळ यांनी शरद पवार आमचे गुरु असल्याचे म्हटले आहे.
विचारधारा आम्ही गुरुकडून शिकलो आहोत
अजित पवार गटाने शरद पवार यांचा मोठा फोटो बॅनरवर लावल्यासंदर्भात छगन भुजबळ यांना प्रश्न विचारण्यात आला. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचेच सदस्य आहोत. शरद पवार आमचे गुरु आहेत. विचारधारा आम्ही गुरुकडून शिकलो आहोत. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आम्ही सत्तेत गेलो. शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. हीच आमची त्यांना गुरुदक्षिणा आहे. अजित पवारही उपमुख्यमंत्री झाले, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.