मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजेत, आपण खरच पवार यांना एकदा मुख्यमंत्री करु. आता अजितदादा मुख्यमंत्री होण्याची संधी आहे, असं मोठं वक्तव्य विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी केलं. काल नाशिक येथील एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी हे वक्तव्य केलं. झिरवळ यांच्या या वक्तव्याने आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यावर अजित पवारांनी देखील प्रतिक्रिया दिली.
अजित पवार म्हणाले, अमुक एक मुख्यमंत्री झाला पहिजे असं वक्ते बोलले, पण फक्त भाषण करुन मुख्यमंत्री होतं नाही. त्यासाठी १४५ आमदारांच संख्याबळ पाहिजे. तसेच ज्या पक्षाची जिथे ताकद आहे ती जागा लढणार असंही अजित पवार म्हणाले. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी झिरवाळ यांची सदिच्छा आहे. मात्र यासाठी महाविकास आघाडी म्हणून जास्त जागा निवडून आल्या पाहिजे. त्यात राष्ट्रवादीच्या जास्त जागा आल्या तर अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात, असं छगन भुजबळ यांनी सांगितले. प्रत्येक पक्षाने मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. प्रत्येक नेत्याने प्रयत्न केले पाहिजे. पण जास्त आमदार निवडून येण्याचे योगदान दिले पाहिजे, असंही छगन भुजबळ यावेळी म्हणाले.
दरम्यान, नरहरी झिरवळ हे विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत. त्यांनी हे मत व्यक्त केलं आहे. मी त्यावर वेगळं मत व्यक्त करणं योग्य नाही. झिरवळ साहेब, काय अजितदादा काय किंवा मी काय आम्हा सगळ्यांना याची जाणीव आहे की संख्या आल्याशिवाय तिथंपर्यंत पोहोचता येणार नाही, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. आम्हाला येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत चांगला परफॉर्मन्स दाखवायचा आहे. परफॉमन्स दाखवल्यानंतर शरद पवार जो निर्णय घेतील त्याची अंबलबजाणी होईल, आणि यात आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असंही जयंत पाटील म्हणाले.