छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर निशाणा; 'त्या'आव्हानानंतर थेट गाढवाची उपमा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 03:11 PM2024-03-18T15:11:56+5:302024-03-18T15:25:36+5:30
मंत्री छगन भुजबळ यांना प्रश्न केला असता, त्यांनी मनोज जरांगे कोण आहे?, असा सवाल करत जोरदार टीका केली.
मुंबई/नाशिक - लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यामुळे राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. राजकीय नेतेमंडळी सभा आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांमध्ये जाऊन भूमिका मांडताना दिसून येत आहेत. त्यातच, मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी निवडणुकांपूर्वी सगसोयरे अंमलबजावणी आणि ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली होती. तसेच, मागण्या मान्य न झाल्यास भाजपाचा ४८ पैकी एकही उमेदवार निवडून येणार नाही, असा थेट इशाराच देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन दिला होता. आता, त्यावरुन, मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगेंवर जोरदार पलटवार केला आहे.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर रविवारी इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप झाला. तर, भाजपाकडूनही निवणुकांची रणनिती आखत तयारी सुरू आहे. त्यातच, मनोज जरांगे पाटील हेही आक्रमक झाले असून लोकसभा निवडणुकांच्या मैदानात हजारो मराठा उमेदवार उतरवण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे बीड जिल्ह्यातील वडवणी येथील सभेत बोलताना त्यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाला लक्ष्य केलं होतं. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन त्यांनी, फडणवीसांना इशारा देत, भाजपाचा ४८ पैकी एकही खासदार निवडून येणार नाही, असे विधान केले. तसेच, मराठा समाजाला आवाहनही केलं होतं. त्याच, अनुषंगाने मंत्री छगन भुजबळ यांना प्रश्न केला असता, त्यांनी मनोज जरांगे कोण आहे?, असा सवाल करत जोरदार टीका केली.
"कोण जरांगे? कुठे कोणाला चॅलेंज करावं ? तेवढी त्याची पोहोच आहे का ? त्याचा राजकारणावर काही अभ्यास आहे का? आरक्षणावरही अभ्यास आहे का? की शिक्षण आहे?", असे प्रश्न छगन भुजबळ यांनी उपस्थित केले. तसेच, २-४ सभांना झालेली गर्दी पाहून मनोज जरांगे पाटलांच्या डोक्यात हवा गेली असल्याचेही भुजबळ यांनी म्हटलं. यावेळी, भुजबळ यांनी टाकीवर चढलेल्या गाढवाचं उदाहरण देत मनोज जरांगे यांची तुलना गाढवासोबत केली आहे. त्यामुळे, आता मनोज जरांगे भुजबळांना काय प्रत्युत्तर देतील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
गाढवाचं उदाहरण देत टोला
"मी मागे एक गोष्ट सांगितली होती. पाण्याच्या टाकी खाली काही पोर उभी होती तिथं विचारल वर काय झालय. तर त्यांनी सांगितले गाढव टाकीच्या वर चढले आहे. त्याला खाली उतरायचे कसे हा विचार करतोय.. तिथे गावातील एक ज्येष्ठ आले ते म्हणाले गाढवाला खाली उतरायचे नंतर बघू, पहिले त्याला वर कोणी चढवले ते अगोदर सांगा", अशी गोष्ट सांगून भुजबळ यांनी जरांगेची तुलना गाढवासोबत केली.
अशोक चव्हाण यांनी घेतली जरांगेंची भेट
मनोज जरांगे यांनी थेट भाजपा आणि देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला होता. भाजपाचा ४८ पैकी एकही खासदार निवडून येणार नाही, असेही त्यांनी म्हटलं. त्यानंतर, माजी मुख्यमंत्री आणि भाजपा खासदार अशोक चव्हाण यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली. ''मराठा आरक्षणावर चर्चेतून मार्ग निघणे गरजेचे आहे. त्यासाठी जितके प्रयत्न करता येतील तितके प्रयत्न आपण करू,'' अशी ग्वाही माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मनोज जरांगे यांना दिली. अशोक चव्हाण यांनी शनिवारी रात्री अंतरवाली सराटी येथे जरांगेंची भेट घेऊन चर्चा केली. शनिवारी रात्री ११:३० ते मध्यरात्री १ वाजेपर्यंत ही चर्चा चालली. मी आज शासनाचा प्रतिनिधी म्हणून नाही, तर समाज म्हणून मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केल्याचंही चव्हाण यांनी यावेळी म्हटलं.
२४ तारखेला समाजाची बैठक: जरांगे पाटील
सरकारने फसवणूक केल्याचे आपण अशोक चव्हाण यांना सांगितले आहे. सगेसोयरेची अंमलबजावणी नाही. गुन्हे मागे घ्यायचे सोडून अधिक गुन्हे दाखल केले जात आहेत. हैदराबादचे गॅजेट्स घेतले नाही. यासह समाजाच्या मागण्या, प्रश्न, शासनाकडून होणारी फसवणूक त्यांच्यासमोर मांडली आहे. ते त्यांच्या परीने प्रयत्न करतील. आता आम्ही २४ मार्च रोजी समाजाची बैठक लावली आहे. त्यात मराठ्यांची पुढील दिशा ठरेल असे मनोज जरांगे पाटील यांनी मध्यामाशी बोलताना सांगितले.