Join us

Lata Mangeshkar : "थम गया सुरों का कारवां, लतादीदींच्या निधनाने संगीतातले एक पर्व संपले"

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2022 11:57 AM

Chhagan Bhujbal Tweet Over Lata Mangeshkar Passes Away : आज लतादीदी यांचे निधन झाले असले तरी संगीताच्या माध्यमातून त्या कायमच अजरामर राहतील असेही छगन भुजबळ म्हणाले.

मुंबई - लतादीदींच्या निधनाचे वृत्त अतिशय वेदनादायी असून त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्राची कधीही भरून न निघणारी हानी झाली असून दिदींच्या जाण्याने संगीतातले एक पर्व संपले असल्याच्या शोकभावना अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहेत. 

आपल्या शोकसंदेशात मंत्री छगन भुजबळ यांनी लता मंगेशकर म्हणजे संगीतातील पूर्णविराम. त्यांच्या गायनाने फक्त भारतातीलच नाही तर जगभरातील संगीतप्रेमीं मंत्रमुग्ध होत असत. म्हणूनच त्यांना संगीतातील गानसरस्वती म्हटले जायचे. आज लतादीदी यांचे निधन झाले असले तरी संगीताच्या माध्यमातून त्या कायमच अजरामर राहतील असेही छगन भुजबळ म्हणाले.

 "नाम गुम जाएगा चेहरा ये बदल जाएगा मेरी आवाज़ ही पहचान है ग़र साथ रहे… !" लतादीदी यांनी गायलेल्या या गाण्याप्रमाणे आज शरीराने जरी त्या नसल्या तरी त्यांचे स्वर कायम आपल्यात राहतील. लतादीदी यांच्या निधनाने मंगेशकर कुटुंबियांवर व संगीतप्रेमींवर दुःखाचा डोंगर कोसळला असून मी व माझे कुटुंबीय मंगेशकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर त्यांच्या  मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो अशी प्रार्थना देखील छगन भुजबळ यांनी केली आहे.

"भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाने स्वर्गीय सुरांचे स्वर्णिम पर्व संपले"

आपल्या स्वर्गीय स्वरांनी भारतीय संगीत क्षेत्राला समृद्ध करणा-या गानकोकीळा, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाचे वृत्त सुन्न करणारे आहे. आपल्या सुमधूर आवाजाने त्यांनी संपूर्ण जगातील रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एक स्वर्णिम पर्व संपले आहे अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. लता मंगेशकर यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करून नाना पटोले म्हणाले की, लता दीदींच्या आवाजात जादू होती, असा आवाज शतकात एखाद्यालाच लाभतो. वडील दीनानाथ मंगेशकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गायनाला सुरुवात केली होती. वयाच्या १३ व्या वर्षी त्यांनी पहिले गाणे गायले होते. आपल्या ७८ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत लतादीदींनी हिंदी, मराठीसह २० भाषांमधील २५ हजारांहून अधिक गितांना आवाज दिला. आनंदघन नावाने त्यांनी अनेक चित्रपटांना संगीतही दिले होते. 

संगीतक्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानासाठी त्यांना महाराष्ट्र भूषण, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न पुरस्कारासह जगभरातील अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. लतादीदी ह्या फक्त महाराष्ट्राचेच नाही तर देशाच्या भूषण होत्या. त्यांच्या निधनाने संगीत आणि सांस्कृतीक क्षेत्राची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. आज त्यांनी जगाचा निरोप घेतला असला तरी आपल्या गाण्यांच्या माध्यमातून त्या चिरकाल स्मरणात राहतील. लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मंगेशकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

 

टॅग्स :छगन भुजबळलता मंगेशकर