Join us

छगन भुजबळ अजित पवारांच्या भेटीला; मलिक म्हणे, आमच्याकडे 52 आमदारांचा पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 9:15 AM

छगन भुजबळ अजित पवारांची मनधरणी करण्यासाठी गेले असून, अजित पवारांचं मन वळविण्यात त्यांना यश मिळतं की नाही हे थोड्याच वेळात समजणार आहे. 

मुंबईः महाराष्ट्रात राजकारणात झालेला भूकंप काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांच्या मनधरणीचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे-पाटील, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ यांनी अजित पवारांना भेटून त्यांचं मन वळविण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ते अपयशी ठरले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनीही अजित पवारांना परत येण्याचं आवाहन केलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता छगन भुजबळ अजित पवारांची मनधरणी करण्यासाठी गेले असून, अजित पवारांचं मन वळविण्यात त्यांना यश मिळतं की नाही हे थोड्याच वेळात समजणार आहे.शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 54 पैकी 52 आमदारांचं समर्थन मिळाल्याची चर्चा आहे. हरयाणातल्या गुरुग्राममधून राष्ट्रवादीच्या 4 आमदारांना मुंबईत आणण्यात आलं आहे. सर्व चारही आमदार भाजपाच्या ताब्यात होते, असा आरोप राष्ट्रवादीनं केला आहे. अनिल पाटील, बाबासाहेब पाटील, दौलत दरोडा आणि नरहरी जिरवार हे चार आमदार अजितदादा समर्थक असल्याचं बोललं जात आहे.अण्णा बनसोडे हे आमदार अद्यापही बेपत्ता आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनीही त्यांचा शोध सुरू केला आहे. बनसोडेही लवकरच राष्ट्रवादीत परततील, असा आशावाद राष्ट्रवादीनं व्यक्त केला आहे. आता फक्त अजित पवार आणि बनसोडे आमदार राष्ट्रवादीबरोबर नसल्याचं बोललं जात आहे. शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांची संख्या 165च्या आसपास आहे. 

टॅग्स :अजित पवारमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019छगन भुजबळ