Join us

भुजबळ पुन्हा उतरणार मैदानात; पुढच्या महिन्यात पुण्यातून 'हल्लाबोल'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2018 1:32 PM

तुरुंगातून सुटल्यानंतर पहिल्यांदाच भाषण करणार

मुंबई: महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा आणि मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी जामीन मिळालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते 10 जूनला पुण्यात भाषण करणार आहेत. तुरुंगातून सुटल्यानंतरचं भुजबळांचं हे पहिलंच भाषण असेल. सध्या राज्यभरात राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा सुरूय. या यात्रेचा शेवट 10 जूनला पुण्यात होईल. छगन भुजबळांच्या भाषणानं या यात्रेचा शेवट करण्याची योजना राष्ट्रवादी काँग्रेसनं आखली आहे. 

गेल्या दोन वर्षांपासून तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना गेल्या आठवड्यात जामीन मंजूर झाला. यानंतर रविवारी त्यांची पोलीस कोठडीतून सुटका झाली. गेल्या काही महिन्यांपासून छगन भुजबळ आजारी असून त्यांच्या स्वादुपिंडाच्या विकारावर सध्या केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या स्वादुपिंडाला थोडी सूज असल्यानं त्यांना उपचारांची आणि विश्रांतीचीही गरज आहे. त्यामुळे जामीन मंजूर झाला असला, कोठडीतून सुटका झाली असली, तरी त्यांना लगेच घरी जाता येईल की नाही, याबद्दल आत्ताच सांगता येत नाही. भुजबळ आणि कुटुंबीय याबाबत डॉक्टरांशी चर्चा करून योग्य निर्णय घेणार असल्याचं कळतं. दरम्यान, दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरण आणि बेहिशेबी मालमत्ता जमवल्याच्या आरोपावरून १४ मार्च २०१६ रोजी छगन भुजबळ यांना अटक करण्यात आली होती. ते दोन वर्षांहून अधिक काळ तुरुंगातच होते. गेल्या शुक्रवारी त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. ५ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची सुटका करण्यात आली आहे. 

टॅग्स :छगन भुजबळराष्ट्रवादी काँग्रेस