Join us  

छगन भुजबळ स्वगृही शिवसेेनेत परतणार ?

By admin | Published: January 13, 2016 12:45 PM

छगन भुजबळ पुन्हा स्वगृही म्हणजे शिवसेनेत परतणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १३ - शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केल्यानंतर नव्वदच्या दशकात काँग्रेस त्यानंतर शरद पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले छगन भुजबळ पुन्हा स्वगृही म्हणजे शिवसेनेत परतणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. 
महाराष्ट्र सदन घोटाळयामुळे राजकीय चक्रव्यूहात सापडलेल्या भुजबळांना शिवसेनेने मदतीचा हात दिला आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्र सदन घोटाळयासंबंधी एक पत्र लिहीले असून, या पत्रातून त्यांनी अप्रत्यक्षपणे भुजबळांना क्लीनचीट दिली आहे. 
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांनी भुजबळांविरोधात नीट चौकशी आणि अभ्यास न करता एफआयआर दाखल केले आहेत. विषयाचे नीट आकलन न करता गुन्हे दाखल करताना घिसडघाई केली आहे. भुजबळांवरील आरोपांना कायदेशीर आधार नसल्याचे दिसते असे या पत्रात म्हटले आहे. 
संजय राऊत यांनी या पत्रातून भुजबळांची पाठराखण केल्याने भुजबळ स्वगृही परतण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. स्वत:हा भुजबळ यांनी या पत्राकडे राजकीय दृष्टीकोनातून पाहू नका असे म्हटले आहे. भुजबळांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांच्याबद्दल प्रचंड असंतोष होता. 
वेळोवेळी शिवसैनिकांनी तो व्यक्त केला होता. मात्र शिवसेनेची सूत्रे उद्धव ठाकरे यांच्याकडे आल्यानंतर हा दुरावा मिटला. त्यामुळे यापूर्वीही भुजबळ शिवसेनेत परतणार असल्याची चर्चा झाली होती.